गावोगावची मैदाने अबाधित राहिलीच पाहिजे! आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मत

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.1
आम्ही वर्षानुवर्षे पिढीजात गुरचरण वा गावाशेजारील मैदानांवर खेळतोय त्यामुळे आमच्या हक्काची मैदाने ही अबाधित राहिलीच पाहिजे, ती सिडकोच्या घशात जाता कामा नयेत ती वाचविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे. मी तर प्रत्येक गावाला हक्काचे मैदान मिळण्यासाठी सतत धडपड करीत आहे त्यामुळेच परिसरातील मोरावे, गव्हाण-कोपर, शेलघर, शिवाजीनगर आदी गावांना अधिकृतरित्या मैदाने मिळवण्यात यश आले आहे. आता न्हावा गावचे ‘गावदेवी मैदान’ही अधिकृत झाले पाहिजे त्यासाठी राजकीय पक्षांच्या चपला बाहेर ठेवा, मैदानांसाठी एकत्र या, असे मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी न्हावा येथे व्यक्त केले. शुक्रवारी रात्री नटराज क्रीडा मंडळ आयोजित प्रकाश झोतातील टेनिस क्रिकेट सामन्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी उपस्थिती दाखविली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महेंद्रशेठ घरत यांचा न्हावा गावचे सरपंच विजेंद्र पाटील यांनी यथोचित सन्मान केला. यावेळी ग्रामस्थ आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
त्यानंतर उरण तालुक्यातील विंधणे प्रीमियर लीगला महेंद्रशेठ घरत यांनी उपस्थिती दाखविली. तेथेही त्यांनी मैदानांचा मुद्दा जोरकसपणे मांडला. तसेच भूमिपुत्रांनो, आपल्या हक्काच्या जागेवर घरे बांधा, जमिनी विकू नका. कारण तिसरी मुंबई चिरनेर परिसरात येऊ घातली आहे. येत्या काही काळात येथील जमिनींचे भाव गगनाला भिडतील, झोपडपट्टी वाढेल, त्यापूर्वीच ग्रामस्थांनी आपापल्या जागांवर गरजेपोटी घरे बांधावीत, नाहीतर पुढे बेघर होण्याची वेळ येईल, त्यामुळे सावध रहा आणि सर्वप्रथम घरांच्या बांधकामांना प्राधान्य द्या, असे आवाहन काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी विंधणे-चिरनेर परिसरातील ग्रामस्थांना केले. यावेळी विंधणे गावातील जुनेजाणते कार्यकर्ते उपस्थित होते.