नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 अंतर्गत बैठक संपन्न शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे – जिल्हाधिकारी

जालना/प्रतिनिधी,दि.30
बदलत्या हवामानाला तोंड देत शेती अधिक किफायतीशिर करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे गरजेचे आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने आणि कृषी विभागामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 सुरु केली आहे. ज्यामध्ये राज्यातील एकुण 21 जिल्ह्याचा समावेश असून जालना जिल्ह्यातील एकुण 176 गावांची निवड केलेली आहे. तरी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 दुसरा टप्प्याअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, कृषी उपसंचालक एस.एच.कायंदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, ग्राम विकासासाठी शेतीचा विकास महत्वाचा ठरणारा आहे. शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या गरजा समजावून घेणे अत्यंत गरजेचे आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 समाविष्ट गावातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना या योजनेची माहिती होण्यासाठी ग्रामस्तरावर जनजागृती करण्यात यावी. गावात ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात प्रकल्पात समावेश असलेल्या गावातील समितीमधील पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेवून त्यांना वेळेत प्रशिक्षीत करावे. असे सांगून शेतीविषयक कामे करताना अपघात होवून मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ मिळण्यासाठी गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेतील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेत त्रुटीची पुर्तता करुन नियमानूसार संबंधितास लाभ देण्यात यावा. असेही त्यांनी सांगितले.



