शाळा बनली जणू बाजारपेठ आरदखेडा जि.प. शाळेत बाल आनंदनगरीला पालकांचा तुफान प्रतिसाद
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.26
जाफराबाद तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आरदखेडा येथे ‘आनंदायी शनिवार’ अंतर्गत आयोजित बाल आनंदनगरी मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. सकाळपासूनच शाळेच्या आवारात मुलांची लगबग दिसत होती. बाजारपेठेच्या धर्तीवर उभारलेल्या आकर्षक रंगीबेरंगी स्टॉलमुळे परिसर गजबजून गेला.
विद्यार्थ्यांनी स्वतः उभारलेल्या पाणीपुरी, गुलाबजामुन, भजे, पापड-चिवडा, पोहे, भाजीपाला, वही-पेन, पुस्तकांचे तसेच स्थानिक फळांचे स्टॉल विशेष लक्षवेधक ठरले. मुलांनी केलेली सजावट, विक्री आणि ग्राहकांशी संवाद यामुळे त्यांच्या गणिती कौशल्याचा, पैशांच्या व्यवहाराचा आणि संवादकौशल्याचा सुंदर सराव झाला. प्रत्यक्ष अनुभवातून आत्मविश्वास वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश यशस्वी ठरल्याचे पालकांनी मत व्यक्त केले.
मेळाव्याला पालक, माता-पालक, गावातील मान्यवर व्यक्ती, युवा, शिक्षण प्रेमी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय समिती, मुख्याध्यापक विनोद घोडेस्वार, शिक्षक मधुकर उखर्डे, संदीप जाधव, सावता तिडके, सुनीता खलसे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी अंगणवाडी सेविका शिंदे मॅडम, जया भिसे, उषा मगरे, संदीप दांडगे तसेच गावकरी यांची उपस्थिती लाभली.
पालकांनी अशा उपक्रमांमुळे मुलांना प्रत्यक्ष व्यवहारातून, हसत-खेळत आणि आनंदाने शिक्षण मिळते यामुळे शाळेची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढेल, अशी प्रशंसनीय प्रतिक्रिया दिली.



