शिक्षण संस्था सचिव, अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून होणाऱ्या शासणाची आर्थिक फसवणूक शिक्षकांच्या आर्थिक पिळवणूका विरोधात अखेर शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांच्या आमरण उपोषणाला सुरुवात !

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.23
जटवाडा रोडवरील अंबरहिल येथील पलक हरिप्रिया शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय विकास संस्था संचालित राजश्री शाहू महाराज प्राथमिक शाळेतील शिक्षकांची संस्थाचालक आणि मुख्याध्यापकां कडून आर्थिक पिळवणूक आणि शासणाची आर्थिक लूट होत असल्याने याच शाळेतील सहशिक्षक श्री बाळू वैजिनाथ पवार हे मराठवाडा शिक्षक संघाच्या भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक २२ जानेवारी २०२६ वार गुरूवार रोजी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या शिक्षण संस्थेचे सदस्य हिरालाल येडुजी गतखने हे असून संस्थेच्या अध्यक्षा दुर्गा हिरालाल गतखने आणि संस्था सचिव ऋषिकेश हिरालाल गतखने हे आहे. शाळेचे मुख्याध्यापक योगेश मानसिंग राठोड हे आहेत. संस्थाचालक आणि मुख्याध्यापक हे शासनाची आर्थिक लूट व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळत आहेत यात प्रशासन देखील यांना मदतच करीत आहेत.
संघटनेच्या प्रमुख मागण्या :-
१) बोगस विद्यार्थी व बोगस आधार गैरवापर शाळेने करून सदरील विद्यार्थी व पालकांची दिशा भूल करून शासनाच्या तिजोरीची आर्थिक लूट केली आहे याबाबत आपण फौजदारी व दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. तर खुद्द तक्रारदार श्री. पवार बाळू वैजनाथ (सहशिक्षक) आणि त्यांच्या मुलाच्या आधार कार्डाचा बोगस वापर करून त्यांना विद्यार्थी म्हणून पोर्टलवर दाखवल्याचा गंभीर गुन्हा केला आहे. हा ‘आयडेंटिटी थेफ्ट’ (Identity Theft) चा प्रकार आहे.
२) प्रशासकीय निष्क्रीयता आपल्या कार्यालयाने शाळा तपासणीचे पत्र काढूनही प्रत्यक्ष तपासणी टाळली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासणीत बोगस विद्यार्थी आढळून आले असतानाही अहवाल दडपला जात आहे.
३) शालेय पोषण आहारातील आर्थिक लूट करणाऱ्या संस्था सचिव व मुख्याध्यापक यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदविण्यात याव.
४) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आपल्या कार्यालयातील अहवालात विद्यार्थी संख्या १४४ असूनही संचमान्यतेत शिक्षक संख्या वाढीव आलेली आहे. व शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील पटपडताळणी याबाबत हे दोन अहवाल मिळणे.
५) वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणे व सेवा पुस्तिकेची द्वितीय प्रत अद्यावत करून देण्यात यावी.
या प्रमुख मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. अशोक ढमढेरे, विनोद केनेकर, कृष्णा गोंडे, विलास चव्हाण, पद्माकर पगार, रावसाहेब बोरसे, अजित जाधव, संभाजी जाधव, रवींद्र मगर, रामेश्वर गोराडे, सचिन मुसळे, सागर सूर्यवंशी, सोनाली गव्हाणे, स्वाती बोंडे, रेखा साकळे, अरुणा चौधरी, सविता हिंगे, शितल कवडे यांनी या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे.



