इस्त्राईल देशात कुशल उमेदवारांना रोजगाराची संधी
जालना/प्रतिनिधी,दि.4
राज्यातील कुशल बेरोजगार युवक-युवतींना इस्त्राईल येथे रोजगारासाठी महाराष्ट्र शासनाने योजना तयार केली आहे. यामध्ये बांधकाम तसेच नर्सिंग व पॅरामेडिकल क्षेत्रातील 1 लाख उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील कुशल बेरोजगार युवक-युवतींना इस्त्राईल देशामध्ये रोजगाराची सुवर्णसंधी निर्माण झाली असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
उमेदवाराची इस्त्राईल देशामध्ये काम करण्याची इच्छा असावी. उमेदवाराला जुजबी इंग्रजी विषयाचे ज्ञान असावे तसेच क्षेत्रासंबंधी प्राथमिक कौशल्य व प्रमाणपत्र असावे. किमान सहा महिने वैध असणारा पासपोर्ट असावा. तसेच वय 25 ते 45 दरम्यान असावे. यामध्ये किमान शिक्षणाची अट नाही तसेच कोणताही प्रदीर्घ आजार झालेला नसावा. अशी उमेदवारासाठी पात्रता ठेवण्यात आलेली आहे.
इस्त्राईल येथे नौकरी मिळविण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीपत्राचे वाटप, आरोग्य विषयक तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येईल. प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना अंदाजित 1 लाख रुपयांपर्यंत मासिक वेतनाची संधी व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी हेल्पलाईन 18001208040 यावर संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.