मानवी प्रगतीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हा महत्त्वाचा पाया – डॉ विशाल तायडे
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.20
विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील शोध किंवा यंत्रे नव्हे; तर तर्कशुद्ध विचार, पुराव्यावर आधारित निर्णय आणि निसर्गातील नियम समजून घेण्याची वृत्ती हीच खरी वैज्ञानिक वृत्ती आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे वस्तुनिष्ठ, तर्कशुद्ध आणि शंका विचारणारी विचारसरणी. अंधश्रद्धा, परंपरा किंवा केवळ भावनेवर आधारित निर्णय न घेता “का?”, “कसे?”, “पुरावा काय?” असे प्रश्नांची उत्तरे वस्तुनिष्ठपणे शोधणे होय असे प्रतिपादन राज्य आंग्ल भाषा संस्थेचे विभागप्रमुख डॉ विशाल तायडे यांनी केले.
छत्रपती संभाजी विद्यालय वाकुळणी येथे कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालनाचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ प्रमोद कुमावत हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप जगरवाळ यांनी भूषविले.
पुढे बोलताना तायडे म्हणाले अंधश्रद्धाविरोधी शक्ती, जादूटोणा, ग्रह-शांती, अपशकुन यांसारख्या अंधविश्वासांना विज्ञानच आव्हान देत असते. आरोग्य, शेती, शिक्षण, उद्योग या सर्व क्षेत्रांत वैज्ञानिक विचारसरणीमुळेच नवी कल्पकता आणि विकास घडत असतो.
विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व व चरित्र निर्माण या विषयावर डॉ. प्रमोद कुमावत यांनी पंचकोश विकास विद्यार्थ्यांसमोर मांडला. विद्यार्थ्यांना योग्य आहाराची माहिती दिली तसेच ऊर्जा व मानसिक आरोग्य कसे अबाधित ठेवता येईल याविषयी मार्गदर्शन केले. जीवन म्हणजेच संस्कार संचय होय. संस्कार हे एका दिवसात घडत नसते तर त्यासाठी सतत चांगल्या गुणांचे अनुकरण करावे लागते असे ते म्हणाले. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. आज माहितीचा प्रस्फोट झाला आहे परंतु तरूण ज्ञानवंत होतांना दिसत नाहीत. मोबाईलच्या आहारी मुलांनी न जाता पुस्तकांच्या विश्वात रमले पाहिजे असेही डॉ कुमावत म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन भोंडे यांनी केले तर प्रास्ताविक संजय पठाडे यांनी केले.यावेळी वक्तृत्व स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संजय भवने, दिपक कुरील यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.



