नगर पालिकांच्या प्रभाग रचनेची सुनावणी आटोपली:18 सप्टेंबरला यादी आयोगास सादर होणार; अंतिम घोषणा 26 सप्टेंबरला, नागरिकांना प्रतीक्षा,
मोर्शी ता./ प्रतिनिधि,दि.17
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व १० नगरपालिका आणि चारही नगर पंचायतींमधील मतदारसंघांची रचना निश्चित करण्यात आल्यानंतर त्याद्वारे तयार झालेले प्रारूप नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यावरील हरकती व सूचनांची सुनावणी आटोपली असून आगामी दोन दिवसांनी (१८ सप्टेंबर) हा अहवाल नगरपालिका प्रशासनामार्फत राज्य निवडणूक आयोगाच्या स्वाधीन केला जाणार आहे. त्यानंतरचे सोपस्कार आटोपल्यावर २६ सप्टेंबरला कोणत्या प्रभागात कोणता भाग येतो, हे अंतिमत: नागरिकांना माहीत होणार आहे. अर्थात त्यासाठीची यादी निवडणूक आयोगाद्वारे घोषित केली जाणार आहे.सध्या स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांचा मोसम असल्याने जिल्हा परिषद-पंचायत समितींपाठोपाठ जिल्ह्यात नगरपालिका व नगर पंचायतींच्या निवडणुकांचेही पडघम वाजले आहेत. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्ष कामाला लागले असतानाच प्रशासकीय हालचालींनीही वेग घेतला आहे. मतदारसंघांची (वार्डांची रचना) रचना निश्चित करणे त्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्यानंतर सदर वॉर्डांमधील कोणते वार्ड कोणत्या संवर्गासाठी आरक्षित करायचे व महिलांसाठी कोणते वॉर्ड राखीव ठेवायचे, हा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील चार नगरपंचायतींपैकी दोन ठिकाणी लोकनियुक्त प्रशासन असल्यामुळे १० नगरपालिका व दोन नगरपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार तब्बल ५२ नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या. त्यावर २ सप्टेंबरपासून सलग तीन दिवस जिल्हाधिकारी यांच्या कक्षात सुनावणी घेण्यात आली.सर्वाधिक १२ आक्षेप अंजनगाव नगरपालिकेच्या प्रारूप रचनेवर घेण्यात आले आहेत. त्याखालोखाल दर्यापुरात ९ तर अचलपूरच्या ८ नागरिकांतर्फे त्या-त्या नगर पालिकांमधील मतदार संघांच्या रचनेबाबत आक्षेप नोंदवले आहेत. मोर्शीच्या प्रारूप रचनेवर ६ नागरिकांच्या तक्रारी आहेत. वरुड नगरपालिका आणि नांदगाव खंडेश्वर व धारणी नगर पंचायतींच्या प्रभाग रचनेवर प्रत्येकी ४ जणांनी हरकती घेतल्या असून चांदूर रेल्वेत ३ तर धामणगाव रेल्वे आणि चांदूर बाजार येथे प्रत्येकी एक तक्रार प्राप्त झाली आहे. अशाप्रकारे जिल्हाभरात एकूण ५२ जणांनी तक्रारी नोंदविल्या. चिखलदरा व शेंदुरजना घाटमधील प्रभाग रचनेबद्दल कोणताही आक्षेप घेण्यात आला नाही. दरम्यान सुनावणीअंती १८ सप्टेंबरला नगरपालिका प्रशासन प्रभाग रचनेची यादी राज्य निवडणूक आयोगास सादर करणार आहे. त्यानंतर २६ सप्टेंबरला आयोगामार्फत ती जनतेच्या दरबारात अंतिमत: जाहीर केली जाईल. या घोषणेची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे. मोर्शी-वरुड विधानसभा मतदारसंघातील शेंदुरजना घाट आणि मेळघाटातील चिखलदरा नगर पालिकांच्या प्रभार रचनेबाबत एकही तक्रार प्राप्त झाली नाही. इतर नगर पालिकांसारखेच या नगर पालिकांच्या मतदारसंघांचे प्रारूप १८ ऑगस्टला घोषित करून त्यावर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना मागवल्या होत्या. परंतु या काळात एकाही नागरिकाने प्रारूप रचनेबाबत तक्रार किंवा सूचना दाखल केली.



