बालगोपाळांनी प्रभातफेरी काढून व्यसनमुक्तीचा दिला संदेश

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.7
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ त्र्यंबकेश्वर गुरुपीठाचे पीठाधीश प.पु.गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे तसेच गुरुपुत्र आदरणीय नितिनभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली बजाजनगर श्री स्वामी समर्थ केंद्रात तीन दिवसीय मूल्यशिक्षण व व्यक्तीमत्व विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले असून आज त्याचा प्रभातफेरी काढून शुभारंभ करण्यात आला.
जवळपास 450 विद्यार्थ्यांनी व बालसंस्कार प्रतिनीधींनी व्यसनमुक्तीवर आधारित प्रभातफेरीत सहभाग नोंदविला. व्यसनमुक्ती संबंधी धूम्रपान मद्यपान, आयुष्याची धूळधाण.,मादक द्रव्याची नशा; अनमोल जीवनाची दुर्दशा अशा
घोषणा देत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष या चिमुकल्यांनी वेधून घेतले.
यानंतर विश्वाच्या कल्याणावर आधारित सामुदायिक प्रार्थना घेत आरोग्यासाठी तसेच मन:शांतीसाठी आवश्यक असणारी योगासने विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असणारी अध्यात्मिक सेवा करत मांदियाळी स्वरूपात अल्पोपहाराचा आस्वाद घेतला.
घरात असताना घरातील छोट्या मोठ्या दुर्घटना घडल्यानंतर विद्यार्थ्यांनी कशाप्रकारची काळजी घ्यावी यासंबंधी प्रात्यक्षिक स्वरूपात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दिंडोरी प्रणित मार्गाच्या सामाजिक कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हिडीओ च्या माध्यमातून करून देण्यात आली.अशाच प्रकारे विद्यार्थ्यांचा बौध्दिक, मानसिक, शारिरीक व सामाजिक विकासासाठी आवश्यक उपक्रमांचे आयोजन येणाऱ्या दोन दिवसात करण्यात येणार आहे. मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी प्रशिक्षण, पर्यावरण पुरक उपक्रम सिडबाँल बनविणे तसेच पाककला अंतर्गत मुलींनी भाकरी/चपाती बनविण्याचे प्रात्यक्षिक, मुलांना आईच्या कष्टाची जाणीव व्हावी म्हणून प्रत्यक्ष कपडे धुणे, आरोग्याची काळजी दृष्टिकोनातून आरोग्य शिबीर अशा विविध उपक्रमांचे आयोजन उर्वरीत दोन दिवसात करण्यात येणार आहे.
तरी बजाजनगर परिसरातील पालकांनी आपल्या पाल्यांना शिबिरासाठी पाठविण्याचे आवाहन बजाजनगर केंद्रातर्फे करण्यात आले.