पळसखेड पिंपळे येथे ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे चर्चासत्र उत्साहात संपन्न

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.12
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची शेतकऱ्यांसाठी चालविलेली संपुर्ण शेती चळवळ हे ब्रीद घेऊन चाललेल्या ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेस आयोजिण्यात येणारे डिसेंबर महिन्यातील नियमित मासिक चर्चासत्र मंगळवारी भोकरदन तालुक्यातील पळसखेड ( पिंपळे ) येथे उत्साहात पार पडले.
ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जालनाचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवार, भोकरदनचे तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. उभयतांनी शासनाच्या विविध योजनांची यावेळी माहिती दिली. भोकरदनचे तालुका गुण नियंत्रक अशोक बिनगे, सहाय्यक कृषी अधिकारी गजानन कुडके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पळसखेड पिंपळे येथील गणेश पिंपळे यांच्या पुढाकारातून गावात किमान पन्नास एक्कर क्षेत्रावर एसआरटी पद्धतीने शेती केल्या जात आहे. त्या पैकी ज्ञानेश्वर लहाने, अमोल पिंपळे, एकनाथ पिंपळे, श्री. गणेश पिंपळे, सुदाम पिंपळे,ज्ञानेश्वर पिंपळे यांच्या एसआरटी शेतीतील मका, कपाशी, आद्रक या शेतावर यावेळी शिवारफेरी करण्यात आली. ही सर्व पिके पाहून उपस्थित शेतकरी समाधान पावले. उपस्थित शेतकऱ्यांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गणेश पिंपळे यांनी केले. वन भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी कंडारी बु. चे ज्ञानेश्वर सिनगारे, अकोला देव चे सुधीर जोशी, दत्तात्रय सवडे, देविदास सवडे, आंबेगावचे दत्तात्रय देठे, राम शिनगारे, जैनपूर कोठारा चे गणेश साबळे, पिंपळगाव थोटे चे दिनकर थोटे, तपोवनचे रावसाहेब मालुसरे, नितेश चव्हाण, चांधई ठोंबरी चे बाबासाहेब ठोंबरे, पळसखेड पिंपळे चे अशोक पिंपळे, जनार्दन पिंपळे, अंकुशराव पिंपळे, गुलाबराव पिंपळे, राजू पिंपळे, ज्ञानेश्वर लहाने, कौतिकराव पिंपळे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.



