पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला विविध विषयांचा आढावा
जालना/प्रतिनिधी, दि 25
अतिवृष्टीमुळे अथवा पुरांमुळे बाधित झालेला जिल्ह्यातील एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी सूचना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा बैठकीत दिल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधिक्षक अजयकुमार बसंल, जि.प. चे अति मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी श्रीमती मुंडे म्हणाल्या, अतिवृष्टीमुळे अथवा पुरांमुळे शेती पिकांचे नुकसानाचे सविस्तर पंचनामे सर्व्हे करुन, सादर केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यासाठी मागणी करण्यात आलेले अनुदान 3 ते 4 दिवसात उपलब्ध होईल. तसेच अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधीची मागणी करण्यात यावी.
तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जीवनावश्यक बाबींसाठी जिल्हा नियोजन अंतर्गत निधी उपलब्ध करुन विविध विकासकामे करण्यात येणार आहे. यामध्ये अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी यांच्याकडे जाणाऱ्या रस्त्यांचे काम प्राधान्य करण्यात येणार आहे. याबरोबरच पुरामुळे गावामधील अनेक जमीनी वाहून गेल्याने शेतकऱ्यांना रोजगार मिळण्यासाठी जमीन खोलीकरण व रुंदीकरणाची कामे रोजगार हमी योजनेतून केल्यास लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच बंधारा दूरुस्ती, ओढे, नदी-नाले यांचे खोलीकरण, वीजेचे अनेक पोल पडलेले असून त्याची दुरुस्तीची कामे, शाळा खोल्यांची दूरुस्ती करणे, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चौका-चौकात सोलार हायमॅक्स लाईट लावून गावातील चौक प्रकाशित करणे असे विविध विकास कामे पालकमंत्री आणि आमदार निधीतून करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे तयारी करता यावी, याकरीता नाविन्यपूर्ण योजनेतून प्रत्येक तालूक्यात विविध सोयी सुविधा असलेले वाचनालय तसेच अभ्यासिका तयार करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. जालना शहराच्या सर्वांगिण विकासाकरीता तसेच सुशोभीकरणांसाठी फेस लिफ्ट उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. या उपक्रमातंर्गत शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण, चौकांचे सुशोभिकरण, उद्यान तयार करणे, तलावाशेजारी वॉकींग ट्रॅक तयार करणे आदी विविध विकासकामांचा समावेश असणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात नुकतीच पोलीस पाटील भरती प्रक्रिया पार पडली असून या भरती प्रक्रियेतून 554 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने ही भरती प्रकिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने पार पाडली याकरीता श्रीमती मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सादरीकरणांद्वारे विविध विषयाची माहिती सादर केली. यावेळी बैठकीस विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.



