स्वातंत्र्यदिन सोहळ्यात जालन्याची धनश्री टेकाळे विशेष अतिथी
जालना/प्रतिनिधी,दि. 19
स्वातंत्र्यदिन सोहळा 2025 मध्ये यावर्षी जालना जिल्ह्यातील तरुणी धनश्री संजय टेकाळे यांची विशेष पाहुणे म्हणून निवड झाली होती. देशभरातील 36 राज्ये व केंद्र शासित प्रदेशांमधून निवडलेल्या 50 माय भारत स्वयंसेवकांमध्ये आणि विशेष उल्लेख म्हणजे राज्यातुन दोन स्वयंसेवकांपैकी धनश्री टेकाळे यांचा समावेश होता. 15 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर झालेल्या या भव्य सोहळ्यास उपस्थित राहणे, हा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरला.
धनश्री मागील दोन वर्षांपासून नेहरू युवा केंद्र संघटनाशी जोडलेल्या आहेत. या प्रवासात त्यांना जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी मार्गदर्शन केले. या प्रवासातील खास बाब म्हणजे धनश्रींसोबत त्यांच्या आईला ही या सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. आज मी जी आहे ती माझ्या पालकांच्या आशिर्वाद, संस्कार आणि पाठिंब्यामुळेच आहे. त्यांना हा गौरवशाली क्षण माझ्यासोबत अनुभवताना पाहून माझे मन कृतज्ञतेने भरून आले. तसेच हा अनुभव माझ्यासाठी केवळ एक संधी नव्हती, तर आयुष्यातील सर्वांत अभिमानाचा आणि अनमोल क्षण होता, जो मी सदैव मनात जपून ठेवेन, असेही धनश्री टेकाळे यांनी सांगितले.
दि. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान झालेल्या या प्रवासात स्वयंसेवकांना इंडिया गेट, पंतप्रधान संग्रहालय, नॅशनल पोलिस मेमोरियल आदी ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळाली. प्रत्येक ठिकाणी देशभक्तीची भावना अधिक प्रबळ होत गेल्याचे धनश्रींनी नमूद केले. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर उभे राहून स्वातंत्र्यदिन सोहळा पाहताना धनश्रींना आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव आला. जेव्हा राष्ट्रगीत दुमदुमलं आणि तिरंगा अभिमानाने फडकला, तेंव्हा अंगावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यात अभिमानाश्रू दाटून आले असे त्या म्हणाल्या. या सोहळ्यानंतर स्वयंसेवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली. ही भेट क्षणिक असली तरी त्यातून मिळालेला आनंद अमूल्य असल्याचे धनश्रींनी म्हटले आहे. असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.



