अनुसूचित जाती- जमातीच्या बेरोजगारांसाठी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.27
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नव उद्योजकांसाठी विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत सन 2025-26 करिता निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत मराठवाडा विभागामध्ये 320 नव उद्योजकांना निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम व तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन विभागीय स्तरावर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आले आहे. तरी प्रशिक्षण कार्यक्रमाचा जालना जिल्ह्यातील बेरोजगार होतकरू तरुण युवक- युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक योगेश सारणीकर व प्रकल्प अधिकारी विनोद तुपे यांनी केले आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये उद्योग संधी, उद्योगाची निवड, उद्योगाचे व्यवस्थापन, लघुउद्योग, सेवा उद्योग, व्यापार उद्योग उद्योगातील विविध टप्पे, उद्योजकीय गुणसंपदा, उद्योगाची जाहिरात, मार्केटिंग, संवाद कौशल्य, प्रकल्प अहवाल, शासकीय कर्ज व अनुदान विषयक योजनांची माहिती, प्रत्यक्ष उद्योगांना भेटी, यशस्वी उद्योजकाचे मार्गदर्शन, उद्योगासाठी लागणारे परवाने, लायसन्स, आदि विषयावर निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार असून सदरील प्रशिक्षण कार्यक्रम हा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मुख्य कार्यालय छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आली असून सदरील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लाभार्थींचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) जालना द्वारा- मराठा बिल्डींग (पार्क), विशाल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर चौफुली, जालना येथे संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.



