नारायण खरात यांचे बालसाहित्य
नारायण खरात यांचे बालसाहित्य
जालना/दि.17
बालसाहित्यात ज्यांना भविष्य आहे असे जालना जिल्ह्यातील , अंबड तालुक्यातील, कवी नारायण खरात यांचा ‘ ढगुल्या ‘ हा बालकविता संग्रह महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी इयत्ता पहिली ते तिसरी या स्तरासाठी ‘ समग्र शिक्षा ‘ अंतर्गत प्रसिद्ध केला आहे. याआधी इसाप प्रकाशन नांदेड यांच्यावतीने त्यांचा ‘ चंद्रावरची सहल ‘ हा बालकाव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.
लहान मुलांच्या कविता कश्या हव्यात? तर ज्या कवितांमध्ये मुलांच्या स्वप्नांची उडान असेल, उडान घेण्याची बुलंद शक्ती असेल आणि ज्या कवितांमधून नैतिक, सामाजिक , आणि तार्किक मूल्यांची गुंफण असेल अशा कविता हव्यात.
नारायण खरात या कवीचे बालमन अशा कविता आकर्षक ढंगात रचतात. म्हणूनच त्या कुतूहलपूर्ण , जिज्ञासा पूर्ण उतरल्या आहे. कवितांची भाषा ही त्यांना इतक्या सहजपणे अवगत झालेली आहे की जणू ही भाषा लहान मुलांच्या तोंडून उतरली आहे.
मुलांचे लहान वय हे खेळाचे वय असते. खेळ खेळताना मुले बडबडत असतात. लयपूर्ण ओरडत असतात. खेळताना त्यांना ओठांमध्ये कोणते तरी गाणे हवे असते. हे गाणे म्हणजे एक प्रकारची कविता असते. म्हणजेच लहानपणी खेळ खेळताना कवितेची महत्त्वाची भूमिका असते. ‘ समग्र शिक्षा ‘ अंतर्गत ज्या स्तरासाठी या कविता निवडल्या आहेत तो स्तर सहा ते नऊ वयोगटाचा आहे. या वयोगटातील मुले उड्या मारतात. खेळतात. फेर धरतात. मुले कधी एकट्याने खेळत नाही .ती समूहाने खेळतात . व समूहाने गाणे म्हणतात. या संग्रहातील कविता अशा बाल समूहासाठी आहे .
ढग ढग ढगुल्या
असा पळत सुटला
आई देते आवाज
थांबतोय कुठला
या शीर्षकस्थ कवितेत ढगाला उद्देशून म्हटलेल्या ‘ ढगुल्या ‘ शब्दात लहान मुलांची बोलीभाषा आली आहे. ‘ ढगुल्या ‘ हा शब्द लहान मुलांना आपलासा वाटणारा आहे. अशा आपुलकीपूर्ण शब्दातून लहान मुले आपल्या परिसरातील शब्दांशी परिचित होतात.
पाठीवरती घर घेऊन हळूहळू चालत जाणाऱ्या गोगलगाईची माहिती कवीने खूप सुंदरपणे आपल्या ‘ गोगलगाय ‘ या कवितेतून करून दिली आहे.
पाठीवरती घर घेई
हळूहळू चालत जाई
स्पर्शज्ञान तिच्या शिंगाला
ओलसरपणा मात्र अंगाला
…………………………
गोगलगाय जिथून जाते
चमचम वाट तयार करते
मराठी बालकवीतेतून मुलांना करून दिलेले असे स्पर्शज्ञान अपवादात्मक परिस्थितीत मराठी बालसाहित्यात आढळून येते. लहान मुलांच्या नजरेतला आकार , प्रकार, रंग ,रूप , हे मोठ्यांच्या नजरेपेक्षा सर्वस्वी भिन्न आहेत. याची जाणीव कवीला असल्यामुळे त्यांच्या कवितेत निसर्गातील सर्व घटक बाल नजरेतून उतरतात.
‘ लाडके झाड ‘ या कवितेत लहान मुलांसाठी ते सोप्या भाषेतून लिहितात की,
एक झाड छायेचे
आईच्या मायेचे
मुलं पाहून खुलते
पानांमधून बोलते
मुलांना झाड आवडते. त्याची ओळख साध्या सोप्या आणि कमीत कमी शब्दातून करून देणे हे कवीचे कौशल्य आहे. वातावरण आणि परिसरातील ज्ञान यामुळे मुलांचा स्वभाव विकसित व्हायला संधी मिळते. ‘ सूर्याचे डोळे ‘ या कवितेतूनही तापलेल्या उन्हाच्या झळाची माहिती मुलांना करून दिली आहे . सूर्याच्या गरम लाटा सगळ्यांना भाजून काढतात. याचा अनुभव मुले वास्तवात घेतात. पण त्या वास्तवतेची सुरेख मांडणी कवितेतून सोप्या भाषेत करून देणे हे नक्कीच सोपे काम नाही . मनोरंजक भाषेतून वातावरणाचे हे संप्रेषण कवीला बाल साहित्यातूनच करावे लागते.
रस बाई रस
आंब्याचा रस
ओरपून खा
म्हणू नका बस
‘ आंबे खाऊ ‘ या कवितेतील या लयदार ओळी मुलांच्या ओठावर सहज खेळतात. आणि तालबद्धपणे मजेत म्हणतात . एकाच वेळी ज्ञानात्मक आणि कलात्मक पातळीवर जाऊन एक चांगला शिक्षकच मुलांच्या मनात अशा सुंदर कवितेचे बीज पेरू शकतो .
केवळ यमक जुळवले की चांगली कविता करता येते असे नाही . तर त्या कवितेतील अनुभव साकल्याने आणि तीव्रतेने मुलांसाठी उभा करणे , त्यातून लय आणि अंतरलय उभी करणे व आशय संपन्न कवितेची निर्मिती करणे हे एक चांगला आणि उत्तम कवीच करू शकतो.
या संग्रहातील कविता म्हणजे निसर्गाची मेजवानी आहे. मुलांना सोप्या आणि छोट्या छोट्या शब्दातून निसर्गाची ओळख करून दिली आहे. पण या संग्रहात ‘ गुगलबाबाची शेंडी ‘ आणि ‘ बाबाची परी ‘या दोन कविता थोड्या वेगळ्या आहे.
‘ गुगलबाबाची शेंडी ‘ ही कविता माहिती तंत्रज्ञानावर आधारित आहे. पण ती इतक्या सोप्या भाषेत लिहिली आहे की, सहा वर्षाच्या मुलालाही ती सहज कळते. मराठी बालसाहित्यातील बदलाची नोंद म्हणजे ही कविता आहे. आज मुले ज्या वातावरणात वावरतात त्या वातावरणात बदल होत आहे. निसर्ग, झाडे ,झुडपे, पशु, पक्षी ,आई, शाळा, मित्र, मैत्रिणी, या नेहमीच्या विषयवास्तु पेक्षा मुलांच्या वातावरणात मोबाईल, गुगल, फेसबुक, युट्युब, यांनी प्रवेश केला आहे त्यांची नोंद घेणारे बालसाहित्य तयार झाली पाहिजे.
‘ गुगलबाबाची शेंडी ‘ या कवितेत नारायण खरात म्हणतात की,
गुगल बाबाची शेंडी भारी
बोटावर फिरवतो दुनिया सारी
गरगर फिरते त्याची दुनिया
एका क्षणात अमेरिका, इंडिया
म्हणतो कसा, बोल मेरे आका ss
मुलांनो तुम्ही खूप खूप शिकाss
शेपटीवाल्या प्राण्यांची सभा भरणे आणि सिंह राजाला सभेचा अध्यक्ष करणे अशा केवळ कल्पनाप्रधान कविता लिहिण्यापेक्षा माहिती तंत्रज्ञानावरील कविता लिहिणे आजच्या काळात मुलांसाठी उपयुक्त आहे. अशा कवितांमध्ये जिज्ञासापूर्ती असते, कुतूहल असते, परिपुर्तता असते ,समरसता असते, रंजकता असते, या सगळ्या मानसिक कंगो-यांना धरून कवितेत येणारी तरलता असते. तरलतेतून नादमाधुर्य उदयाला येते. नाद माधु-यांनी तालबद्धता येते. व अशा कवितेतून मुलांची श्रवण क्षमता विकसित होते. कल्पित आणि अद्भुत बाल विश्वातून मुलांना बाहेर काढणाऱ्या या कवितेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
‘ ढगुल्या ‘ हा कवितासंग्रह अवघ्या सात कवितांचा आहे. पण तो ज्या स्तरासाठी तयार केला आहे त्यांच्यासाठी तो नक्कीच पुरेसा आहे. पहिली ते तिसरीच्या मुलांसाठी पुस्तक किती पानाचे हवे याला महत्व नाही. तर ते कसे हवे याला महत्व आहे. ‘ ढगुल्या ‘ हा कवितासंग्रह एक प्रकारे चित्र काव्यसंग्रह आहे. भरपूर चित्रांमध्ये कवितेच्या ओळी फुलांसारख्या डोकावताना दिसतात. चार कडव्यांची कविता दोन पानावर विखुरलेली आहे. चित्रेही रंगीत स्वरूपाची आणि त्यामध्ये मुले हरवून जातील अशी आहेत. मुलांनी चित्रातून आशय शोधावा अशी आहेत. लहान मुलांनी पुस्तक हातात घेतले तर ती कंटाळणार नाही.. पुन्हा पुन्हा मन भरेपर्यंत आणि डोळे तृप्त होईपर्यंत या कवितांचा वर्णनीय आस्वाद घेतील अशा या कविता आहेत. नेत्रस्पर्श, भावस्पर्श? मनस्पर्श, करणाऱ्या या कविता नक्कीच कवीच्या कवितेची उंची वाढवणा-या आहेत. यालाच बालमन खूलवणारे बालसाहित्य असे म्हणता येईल.

पुस्तकाचे नाव: ढगुल्या (बालकविता संग्रह)
कवी: नारायण खरात
पुस्तक समिक्षण :
प्रा. साईनाथ पाचारणे
तिन्हेवाडी
तालुका खेड जिल्हा
पुणे 410 505
मोबाईल 96 23 86 26 46