शेतकऱ्यांनी कृषी औजारासाठी अर्ज सादर करावेत
जालना/प्रतिनिधी,दि.6
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून जिल्हा परिषद उपकर योजना सन 2024-25 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डिबीटीद्वारे 50 टक्के अनुदानावर महत्तम मर्यादेच्या अधिन राहुन कृषी औजारासाठी अनुदान देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी औजारे मागणीसाठी संबंधित पंचायत समितीमध्ये सोमवार दि.30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
कृषी औजारात 50 एच.पी.ट्रॅक्टर, 3 किंवा 5 एचपी कडबाकुटी, ट्रॅक्टरचलीत पल्टीनांगर तसेच पेरणीयंत्र, रोटाव्हेटर आणि पीव्हीसी पाईप यांचा समावेश आहे. 50 एच.पी.ट्रॅक्टरसाठी किंमतीच्या 50 टक्के किंवा 90 हजार रुपयांपर्यत अनुदान देण्यात येईल. कडबाकुटी यंत्रासाठी किंमतीच्या 50 टक्के किंवा 16 हजार 500 रुपयाच्या मर्यादेत अनुदान रक्कम देण्यात येईल. ट्रॅक्टरचलीत पल्टीनांगर तसेच पेरणीयंत्रासाठी किंमतीच्या 50 टक्के किंवा 20 हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान रक्कम देण्यात येईल. रोटाव्हेटरसाठी किंमतीच्या 50 टक्के किंवा 35 हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान रक्कम देण्यात येईल. पीव्हीसी पाईपसाठी किंमतीच्या 50 टक्के किंवा 15 हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान रक्कम देण्यात येणार आहे. असे कृषी विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.