छत्रपती संभाजी महाराज उद्यानाची (मोतीबाग) अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.लाईट नसल्याने उद्यानात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून उद्यानातील सर्व सुविधा देण्यासह शेजारी असलेला जलतरण तलाव देखील तात्काळ सुरू करावा अशी आग्रही मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी गटनेते अशोक पांगारकर यांनी जालना महानगर पालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.
या निवेदनात पांगारकर यांनी म्हंटले आहे की,जालना शहरातील नागरिकांसह,महीला आणि बच्चे कंपनीला विरंगुळ्यासाठी फक्त छत्रपती संभाजी महाराज उद्यान (मोतीबाग)हाच पर्याय आहे.परंतु सद्य परिस्थितीमध्ये या उद्यानातील अंतर्गत सुविधांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.उद्यानात लाईट नसल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून त्यामुळे ७ वाजता म्हणजे अंधार पडण्याच्या अगोदर विरंगुळ्यासाठी येणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यात येते.तसेच उद्यानातील रस्त्यामध्ये लोखंडी पुलाचे अवशेष टाकण्यात आलेले आहे.वास्तविक सर्व उद्यानाचे नुतणीकरण करणे गरजेचे आहे, परंतु ते जेव्हा होईल तेव्हा होईल. परंतु सद्याच्या परिस्थितीत संपुर्ण उद्यानात लाईटची व्यवस्था तात्काळ करुन घ्यावी व रस्त्यातील लोखंडी पुलाचे सामान इतरत्र हलविण्यात यावे.जेणे करुन नागरिकांना,बच्चे कंपनी तसेच जेष्ठ नागरिकांना
उद्यानाचा वापर करतांना अडचणी निर्माण होणार नाही. ही कामे तात्काळ करुन सर्वासाठी उद्यान ४ ते ८ वाजेपर्यंत
खुले करण्यात यावे तसेच या उद्याना शेजारी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव देखील मागील बऱ्याच कालावधीपासून बंद अवस्थेत असून शहरातील जलतरण पटु, स्पर्धक यांची मोठी गैरसोय होत आहे.भविष्यात या ठिकाणी जलतरण स्पर्धा घेता आल्या पाहिजेत याचा विचार करून सद्यस्थितीत जलतरण तलावाची खोली कमी न करता त्याचे नुतनीकरण करुन नागरिकांकरीता तलाव खुला करावा अशी मागणी करून एखाद्या चांगल्या एजन्सीला सदरील तलाव वार्षिक करारानुसार देवून सदर समस्या तातडीने मार्गी लावाव्यात अशी मागणी अशोक पांगारकर यांनी जालना महानगर पालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.