वालसा डावरगाव शाळेच्या चार विद्यार्थ्यांची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड
भोकरदन/संजीव पाटील,दि.10
दिनांक ८ व ९ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत वालसा डावरगाव शाळेच्या चार विद्यार्थ्यांची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
भोकरदन येथे झालेल्या तालुकास्तरीय 14 वर्षाखालील शालेय क्रीडा स्पर्धेत इयत्ता आठवीतील अतुल रमेश वाघ याने उंच उडी प्रकारात प्रथम तसेच अडथळ्यांच्या शर्यतीत द्वितीय, इयत्ता सातवीतील प्रतीक मधुकर शिंदे याने 400 मीटर धावणे प्रकारात प्रथम, इयत्ता सातवीतील चैताली दिनकर जाधव हिने लांब उडी प्रकारात द्वितीय व अंकिता गजानन वाघ हिने थाळीफेक प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हास्तर स्पर्धेसाठी पात्रता निश्चित केली. तसेच खो-खो संघाने 14 वर्षे वयोगटाखालील मुलांच्या खो-खो स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले.
बरंजळा साबळे केंद्राचे केंद्रप्रमुख एस. एस. भुजंग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत ‘पुरेसे मैदान उपलब्ध नसतानाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश वाखण्याजोगे आहे’ असे उद्गार काढले. गावच्या सरपंच अर्चना दीपक जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश शिरसाठ यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शाळेला लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
शाळेचे मुख्याध्यापक टी. टी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना रामेश्वर दांडगे, आशिष भोवते, गणेश लोलेवार सोनवने यांचे मार्गदर्शन लाभले.



