सातपुडा पर्वतात 30 हजार वर्षे अश्मयुगीन जीवनशैलीचा ठेवा:डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनमधील योग विभागाच्या विद्यार्थ्यांची भोरकप भेट
मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि 27
मोर्शी : अमरावती महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेगलत अमरावती मोर्शी तालुक्यातील धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेला सालबर्डी परिसर जसा धार्मिक तसाच अश्मयुगीन जीवनशैली व आदिम संस्कृतीने समृद्ध आहे. या भागातील सातपुडा पर्वत रांगेतील या परिसरात अनेक विशालकाय खडकांच्या रांगा असून, त्यावर पाषाणयुगीन चित्रकारी कोरलेली आढळून आली आहे.डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन येथील योगशास्त्र विभागाची नुकताच शैक्षणिक साहसी सहल मोर्शीलगतच्या भोरकप धारुल येथे गेली होती. या सहलीला बी. ए. योगशास्त्र या अभ्यासक्रमाचे ३८ विद्यार्थी व ३६ विद्यार्थिनी उपस्थित होत्या. योगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनील लाबडे, प्रा. संदीप मांदळे, प्रा. प्रतीक पाथरे, प्रा. संपदा आगरकर, प्रा. प्रणय पवार, प्रा. सागर हाते, प्रा. सुषमा शिरभाते यांच्या मार्गदर्शनात या सहलीचे आयोजन केले होते. देवीच्या गुफेपासून साधारणपणे ३ किमी अंतरावर ३० हजार वर्षे जुना ऐतिहासिक ठेवा जंगलात विशालकाय दगड व गुंफेमध्ये असलेल्या रॉक पेंटिंगचे निरीक्षण आणि संशोधन योग विभागाच्या विद्यार्थ्यांना करता आले.या परिसरातील मशरूमच्या आकारातील दगडांवर अश्मयुगीन जीवन शैलीची साक्ष रेखाटलेली होती. गर्द लाल रंगात तिथे सुंदर आणि सुबक आकृती तिथे रंगवल्या होत्या. या बाबत योग विभागाचे प्रा. प्रतीक पाथरे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, या सुंदर चित्रांची ऐतिहासिक प्रामाणिकता म्हणजे २००७ मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने या सर्व चित्रांची कार्बन डेटिंग केल्यानंतर या चित्रांचा काळ हा ३० हजार वर्षे जुना आहे. यामध्ये कासवाच्या आकाराचे चित्र, मानवी पेशींच्या आकाराचे चित्र, हत्ती, बैल, हरीण, लांडगा, असे विविध प्राणी कित्येक दगडांवर रेखाटले आहेत. आदिम संस्कृतीचे दर्शन: ही चित्रकारी आदिम संस्कृतीचे दर्शन घडवणारी आणि इ.स.पूर्व २५,००० ते १५,००० या दरम्यान मानवी अस्तित्वाचा इतिहास उलगडणारी असल्याचा अंदाज ‘रॉक आर्ट’ अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आज हा आदिम संस्कृतीचा ठेवा काळाच्या ओघामध्ये लुप्त होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाच्या पुरातत्व विभागाद्वारे या अश्मयुगीन संस्कृतीचे जतन आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेण्याची गरज असल्याची भावना एचव्हीपीएमच्या योग विभागातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सातपुडा पर्वत रांगेतील या परिसरात विशालकाय खडकांच्या रांगा आहेत.भीमबेटका प्रमाणे मिळावे संरक्षण मध्य प्रदेशातील भीमबेटका जगप्रसिद्ध पुरातत्त्व वारसा स्थळ आहे. त्यातही आदिम संस्कृतीच्या अवशेषांची ओळख सांगणारी चित्रकारी आहे आणि एक लाख वर्षापूर्वी मानवी अस्तित्वाच्या खुणा त्यात आहेत. एमपी सरकारने या क्षेत्राला संरक्षित केल्याने या क्षेत्राची जागतिक ओळख निर्माण झाली आहे. सातपुडा पर्वत रांगेतील या भोरकप, सालबर्डी व डोंगरगावसारख्या क्षेत्रांनाही याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने संरक्षित करण्याची गरज असल्याचे मत योग विभागाच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.या सहलीदरम्यान धारुल येथील अंबा देवी दर्शन तसेच ३० हजार वर्षे जुनी आदिमानवाने काढलेल्या रॉक पेंटिंग विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. अश्मयुगीन मानवाचे जीवनशैली कशी होती त्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याकरिता धारुल येथून ट्रेकिंगला सुरवात झाली, ज्यामध्ये २.५ किमी अंतरावर अंबा देवी गुहेत देवीच्या दर्शनासाठी सर्व विद्यार्थी पोहोचले.



