बिबट्यासाठी कोट्यावधीच्या शेळ्या सोडणारे मंत्री गरिबांच्या शेतकर्यांच्या नुकसानी कडे लक्ष देतील काय? – बोरशे गुरुजी

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 12
मंत्री महोदयाच्या सुपीक डोक्यातून आलेली ” बीबट्यांनो उपाशी काय राहता शेळ्या खा!” योजना आणि जनतेचे होणारे नुकसान याचा कोणताही संबंध लावण्याची मंत्रि महोदयाला गरज वाटत नाही.कारण ते मंत्री आहेत ना!
काल माझ्या कपाशीच्या शेतात धनगर बंधुनी मेंढ्या चारण्यास आणल्या होत्या !रात्री अज्ञात प्राण्याने ( लांडगा / बीबट्या ) त्यांची एक मेंढी मारली ! आता पर्यंत आठ दहा मेंढ्या वेगवेगळ्या ठिकाणी मारुन जंगली प्राण्यांनी खाल्ल्याने नुकसान झाल्याचे तो बांधव धाय मोकलुन रडून सांगत होता. एक बैल मेल्याचेही सांगत होता.शासन व प्रशासनाने दखल घ्यावी ही विनंती मी प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांच्याकडे पाठवली आहे बघू त्या बिच्यार्याला नुकसान भरपाई मिळते काय? नुकसान धारकाचे नांव गंगाराम नाना तांबे रा.नादगांव ता.नांदगाव जि नाशिक. 9529947488असे असुन
गट नं. 212 करजगांव ता.भोकरदन जि.जालना दिनांक 12 /12 / 2025 रोजी ही घटना घडली आहे. वादळ वाऱ्यात पाण्या पावसात सतत भटकंती करून जीवाची पर्वा न करता आपल्या शेळ्या मेंढ्यांना लेकराप्रमाणे जपणारे हे लोकं झालेले नुकसान जीवाला मारुन सहन करत असतात. जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्यांचे अतोनात नुकसान होते.
आज-काल जंगलामध्ये हरणांची संख्या वाढलेली आहे तसेच रोही या प्राण्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेतमालाचे हे प्राणी नुकसान करत आहेत. त्यातच बिबट्याच्या व लांडग्यांच्या दहशतीने शेतामध्ये जाणे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका होईल अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रात्री बे रात्री शेतामध्ये जाणे शेतकऱ्यांना धोक्याचे झाले आहे. त्यातच बिबट्यांना खाण्यासाठी शेळ्या सोडण्याची शक्कल मंत्री महोदयाच्या सुपीक डोक्यातून बाहेर आलेली आहे.त्या शेळ्या बिबट्यांना भोजन म्हणुन कामात येतील की,शेतकर्यांच्या शेतमालाचे नुकसान वाढवतील हे मंत्री महोदयच सांगु शकतील. शेळ्या शेतमालात नाही तर गुपचुप जंगलातुन चरुन बिबट्याला शोधत शोधत बिबट्यांकडे जातील आणि बिबट्यांची भुक भागवतील. अशा प्रकारे अतिशय परिश्रम व विचार करुन सुंदर अशी ” बीबट्यांनो उपाशी काय राहता शेळ्या खा!” योजना सुरु होत आहे.
अशाप्रकारे आपले लोकप्रतिनिधी जनतेची पर्वा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी योजना बनवत असतात. नुकतेच नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी चंगळ करून घेतली. कोट्यावधी रुपयाचा चुराडा केला. या सर्व खटाटोपा मधून जनतेच्या पदरात काय टाकले. याचा हिशोब प्रत्येकाने आपल्या मनाशी करणे गरजेचे आहे. सध्या प्रत्येक जन नाकात वारा शिरल्याप्रमाणे जे मनाला येईल त्याप्रमाणे वागत आहे. जे मनात येईल त्याप्रमाणे बोलत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यामध्ये जनतेचा वेळ आणि जनतेचा पैसा वाया जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचे कोणालाच सोयरसुतक नाही. जनतेचे प्रश्न सोडवायचे तर यांचेच प्रश्न जनतेला दररोज वादातून ऐकावी लागतात आणि यासाठीच आपण या लोकप्रतिनिधींना निवडून दिले काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. अवैध धंदे वाढलेले आहेत. शेतकऱ्याला शेती परवडत नाही व्यापाऱ्याला व्यापार परवडत नाही अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. शेतकरी हालाखीचे जीवन जगत आहे. शेतकऱ्याला निसर्गाची साथ नाही. प्रशासनाची साथ नाही. शेतकरी कल्याणाचे कोणते टिकाऊ धोरण शासनाकडे नाही.एखादी तटपुंजी मदत शासनाने जाहिर केली तर शेतकऱ्याच्या पदरामध्ये प्रशासन पडू देत नाही. लाच दिल्याशिवाय कोणत्याच सरकारी कार्यालयात काम होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणूस कोणाकडेही न बोलता गुपचूप आलेल्या अडचणी व दुःख सहन करत आहे. परिस्थिती जास्त बिघडण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी जन माणसाच्या मनाची चाहूल घेऊन राज्यातील जनतेचे प्रश्न काळजीने सोडवणे गरजेचे आहे.



