बीड जालना माध्यमिक शिक्षण विभागातील रिक्त जागा भराव्यात – मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन!
जालना/प्रतिनिधी, दि 17
बीड व जालना माध्यमिक शिक्षण विभागातील रिक्त जागांमुळे शिक्षकांची अनेक कामे खोळंबून पडली आहेत. त्यामुळे शिक्षकांमधे प्रचंड असंतोष व चिड निर्माण झाली आहे. त्याची दखल घेऊन या दोन्ही जिल्ह्य़ातील माध्यमिक शिक्षण विभागातील रिक्त जागा ताबडतोब भराव्यात अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम व छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण यांनी शिक्षण उपसंचालक मा. प्रकाश मुकुंद साहेब, शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. बीड व जालना माध्यमिक शिक्षण विभागात अनेक जागा रिक्त असल्याची बाब निदर्शनास आणली. या दोन्ही जिल्ह्य़ातील सेवानिवृत्ती विभागात कर्मचारी नाही. त्यामुळे सेवानिवृत्त प्रस्ताव पाठविणे व मंजूर होवून आलेल्या सेवानिवृत्ती प्रस्तावावर पुढील कार्यवाही होण्यास विलंब होत आहे परिणामी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले व सेवानिवृत्त झालेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अडचणीत आले आहेत. बीड येथे लिपिकाचे पद रिक्त असल्याने सर्व कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे. जालना माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी व अधिक्षक ही पदे रिक्त असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. या दोन्ही जिल्ह्य़ातील वेतन पथक कार्यालयातही जागा रिक्त असल्याचे शिक्षण उपसंचालक साहेब यांच्या निदर्शनास आणून दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असल्याने कामाचा खोळंबा वाढला आहे. परिणामी शिक्षकांमधे प्रचंड असंतोष व चिड निर्माण झालेली आहे. याची ताबडतोब दखल घेऊन या रिक्त जागा भराव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.

