मोर्शीत घडली थरकाप उडवणारी घटना नराधमाला अटक

प्रतिनिधि/मोर्शी,दि.25
मोर्शी : रात्री कामावरून घरी येताना वडिलांना थंडी वाजू नये म्हणून त्यांचे स्वेटर पोहोचवण्यासाठी एक १७ वर्षीय मुलगा गेला होता. स्वेटर देऊन घरी परत येताना त्याला एक अनोळखी तरुण भेटला. त्या तरुणाने मुलाला अनैसर्गिक कृत्याची मागणी केली. मुलाने नकार दिला म्हणून त्या तरुणाने मुलाच्या डोक्यात चार ते पाच दगड घातले. यामध्ये मुलगा रक्तबंबाळ झाला. त्या परिस्थितीत नराधम आरोपीने क्रूरतेची परिसीमा ओलांडून रक्तबंबाळ व अर्धमेल्या स्थितीतील मुलावर अनैसर्गिक कृत्य केले. याचदरम्यान काचेच्या बॉटलने त्याचा मागील भाग चिरला. त्यानंतर मुलाच्या डोक्यावर पुन्हा वारंवार दगड घालून त्याचा खून केला. इतकेच नाहीतर हा नराधम रात्रभर मृतदेहापासून अवघ्या १०० फुटावर झोपला. या नराधमाला स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी दि. २४ सायंकाळी अटक केली.हे हैवानी कृत्य करणाऱ्या नराधमाचे नाव दिनेश ऊर्फ गोलू भुद्दू उईके २०, रा. घोडगव्हाण असे आहे. दिनेश उईके हा शेतात रखवालीचे काम करतो. गुरुवारी दि. २३ रात्री तो एका देशी दारू दुकानात दारू पिण्यासाठी गेला होता. त्याच ठिकाणी त्याची नजर या १७ वर्षीय मुलावर पडली. मुलगा काही कामासाठी दुकानाजवळ गेला होता. त्यावेळी दिनेश मुलाजवळ गेला आणि त्याला अनैसर्गिक संबंधाची मागणी करू लागला. मुलाने त्याला नकार दिला. त्यानंतर मुलगा घरी जाण्यासाठी पायी निघाला, त्यावेळी दिनेशही त्याच्यासोबत येत होता. काही अंतरावर त्याने मुलाला मोबाइल मागितला, मला कॉल करायचा आहे, असे सांगितले. त्याने कॉल केला मात्र मुलाला बराचवेळ मोबाइल परत केला नाही. हा मुलगा मोबाइलसाठी त्याच्या मागे मागे गेला, दरम्यान मोर्शी ते अमरावती मार्गावरील शिरभाते मंगल कार्यालयापासून काही अंतरावर अंधाराचा फायदा घेत दिनेशने मुलाला खाली पाडले आणि जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. मात्र मुलाने त्याचा प्रतिकार केला. त्यावेळी दिनेशने चार ते पाचवेळा मुलाच्या डोक्यात दगडाने प्रहार केला. यामुळे मुलगा रक्तबंबाळ झाला. त्या स्थितीत दिनेशने मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. काही वेळानंतर मुलाने हालचाल केली. त्यावेळी क्रौर्याची परिसीमा ओलांडून या हैवानाने मुलाच्या मागील बाजूला दारूची बॉटल फोडली आणि मारली.यामुळे मुलाला अतिगंभीर जखम झाली. त्यानंतर त्याने मोठा दगड उचलून दोन ते तीन वेळा मुलाच्या डोक्यात घातला. यातच मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान त्यानंतर दिनेश उईके पसार झाला होता. शुक्रवारी सकाळपर्यंत मुलगा घरी गेला नाही. तसेच सकाळी नागरिकांना मुलाचा केवळ अंगात शर्ट असलेला रक्तंबबाळ मृतदेह दिसला. त्यामुळे हा खून असल्याचे समोर आले होते. मृतकाची ओळख पटली मात्र मारेकरी कोण हे समोर आले नव्हते. परिसरात कुठेही सीसीटीव्ही नव्हते. याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता मोर्शीपासून जवळच असलेल्या निंभी शिवारात आरोपी असल्याची माहिती मिळताच एलसीबीचे पीआय किरण वानखडे, पीआय नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात एपीआय सचिन पवार, पीएसआय सागर हटवार व त्यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी आरोपीला अटक केली.आरोपीने एक कॉल केला अन् अडकला या घटनेतील आरोपी कोण हे ओळखण्यासाठी पोलिसांसमोर विशेष पर्याय नव्हते. मात्र त्याने खून करण्यापूर्वी पीडित मुलाच्या मोबाइलवरून एक कॉल केला होता. ही माहिती पोलिस तपासात समोर येताच पोलिसांनी आरोपीला अवघ्या काही तासांत शोधून ताब्यात घेतले.