आगामी तीन महिन्यात सफाई कर्मचाऱ्यांचे हिपॅटायटीस बी लसीकरण पूर्ण करावे – सदस्य डॉ.पी.पी.वावा

जालना/प्रतिनिधी,दि.4
सफाई कर्मचाऱ्यांना हिपॅटायटीस बी विषाणूजन्य संसर्ग होवू नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांना नि:शुल्क लसीकरण करण्याची व्यवस्था करण्यात यावी. आगामी तीन महिन्यात जालना जिल्ह्यात शिबिरे घेवून सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे हिपॅटायटीस बी लसीकरण पूर्ण करावे, अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची बैठक डॉ.वावा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस सल्लागार श्री.जिजेंद्र, समन्वयक श्री.चरण, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, उपायुक्त नंदा गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ.वावा म्हणाले की, सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे निर्देशही डॉ.वावा यांनी दिले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची सफाई कर्मचाऱ्यांना मदत मिळण्यासाठी शासन निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी. सफाई कामगारांना कठीण समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. तसेच हक्कापासून सफाई कामगार वंचित राहणार नाही. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर केवळ अर्थसहाय्य न देता त्यासोबत त्यांच्या पाल्यांना माध्यमिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, वृध्द आई-वडिलांना पेंशन तसेच त्यांना घर नसल्यास घरबांधणीसाठी सुध्दा अर्थसहाय्य करणे गरजेचे असल्याचे मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानूसार कार्यवाही करण्यात यावी.
सुरुवातीस जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका व नगरपंचायतीचा आढावा घेतला. लाड पागे समितीच्या शिफारशीनूसार वारसा हक्क नियुक्ती प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. सफाई कर्मचारी कार्यरत असलेल्या सर्व आस्थापनांचा व त्यातील प्रलंबित असलेल्या प्रकरणांचाही त्यांनी आढावा घेतला. सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी तसेच अस्थायी व स्थाई सर्व सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश, गमबुट, हँडग्लोज, रेनकोट, थंडीचे स्वेटर आदी साहित्य वेळोवेळी पुरवठा करण्यात यावा. त्यांच्या ओळखपत्रावर मोबाईल क्रमांक, रक्तगट, ईपीएफ, ईएसआयसी नंबरही अनिवार्य करण्यात यावा. आणि सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करण्यात यावे. अशी सुचनाही सल्लागार जिजेंद्र यांनी यावेळी केली. यावेळी सफाई कर्मचारी व त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.