शाश्वत विकासासाठी माणूस महत्त्वाचा. – कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के.

नांदेड/प्रतिनिधी, दि 23
नांदेड : जगामध्ये वेगवेगळ्या देशात विकासासाठी स्पर्धा लागलेली आहे. जलद विकास घडवून आणण्यासाठी देशातील नैसर्गिक साधनसमग्रीचा अमाप वापर करून आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न होत आहे. हा आर्थिकविकास होत असताना नैसर्गिक साधन सामग्रीचा विनाश होतो की काय? अशी शंका येत आहे. यामुळे जागतिक पातळीवर आर्थिक विकास होईल हे पण या विकासामध्ये माणसाचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही असे वाटते. म्हणून शास्वत विकासामध्ये माणूस टिकणे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा चे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांनी केले .
ते पीपल्स कॉलेज नांदेड येथे प्रा. आर. एस. सोळुंके व्याख्यानमालेमध्ये ‘सर्व समावेशक शाश्वत विकासाच्या दिशेने भारत‘. या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनिलकुमार वावरे (अध्यक्ष – मराठी अर्थशास्त्र परिषद) हे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे प्र- कुलगुरू डॉ. ए. एम. महाजन यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. आर. एस. सोळुंके उपस्थित होते. यावेळी मंचावर मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ.अविनाश निकम, कार्यवाह-खजिनदार मारोती तेगमपुरे, कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ. विजय भोपाळे, डॉ. सुभाष सावंत व परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप अर्जुने पीपल्स कॉलेज चे उप प्राचार्य डॉ. ए. एन. सिद्धेवाड डॉ. सचिन पवार यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के म्हणाले की, आर्थिक विकासाच्या हव्यासामुळे पर्यावरणातील नैसर्गिक घटक संपुष्टात येत आहेत. त्याचबरोबर उत्पादन घटकाची मालकी काही ठराविक लोकांकडे निर्माण होत आहे. यामुळे आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला केवळ उपभोक्ता वर्ग वाढत आहे. असा विषम आर्थिक विकास करत असताना माणूस जिवंत राहिला पाहिजे. देशाच्या विकासात माणूस महत्त्वाचा आहे . याचा विचार करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. ए. एम. महाजन यांनी केले. ते आपल्या उद्घाटकीय भाषणात म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पर्यावरणाला महत्त्व दिलेले आहे. पर्यावरणाची जाणीव व्हावी यासाठी अभ्यासक्रम तयार करण्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. याचा विचार प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनी करावा. पर्यावरणाचा विचार करूनच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करावी लागेल असे भाऊ उद्गार त्यांनी यावेळी काढले.
प्रा.आर.एस. सोळुंके व्याख्यानमालेच्या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीपल्स कॉलेजमधील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विकास सुकाळे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली . मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष अविनाश निकम यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्यवाह-खजिनदार डॉ . मारोती तेगमपुरे यांनी प्रा. आर. एस. सोळुंके यांचे अर्थशास्त्र विषयातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्यामध्ये योगदान स्पष्ट केले. ही व्याख्यानमाला म्हणजे प्रा.आर. एस. सोळुंके यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव आहे असे प्रतिपादन करून प्रा. आर. एस. सोळुंके व्याख्यानमाला आयोजनाची मागील पार्श्वभूमी स्पष्ट केली.
या कार्यक्रमांमध्ये प्रा. आर. एस. सोळुंके यांनी या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि या कार्यक्रमाला ग्रामीण भागाच्या विकास साठी स्थानिक पातळीवर काम करणारे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील विचारवंत यांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. अनिलकुमार वावरे म्हणाले की, कोणत्याही देशाचा सर्व समावेशक आर्थिक विकास करत असताना देशातील साधन सामग्री भविष्यकालीन पिढीसाठी शिल्लक राहणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा विचार प्रत्येक देशांनी करावा. या कार्यक्रमासाठी पीपल्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. ए. एन. सिधेवाड, डॉ. सचिन पवार तसेच महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, प्राचार्य, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.टी. जनकवाडे यांनी केले तर आभार प्रा. बी. एन. कदम यांनी मानले.