महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्री व प्रदर्शनीचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.10
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जालना तर्फे तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उदयम विकास प्रकल्पांतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने 11 नोव्हेंबर 2023 पर्यंत दिवाळी विविध महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. जालना शहरातील मामा चौकाच्या शेजारी पोलीस कॉम्प्लेक्समधील शोभा प्रकाश मंगल कार्यालय येथे या प्रदर्शनीचे आयोजन केले आहे, सर्वांनीच याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाबार्डचे सहा महाव्यवस्थापक तेजल क्षीरसागर यांनी केले.
जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे आणि महिला उदयोजिका शर्मीला जिगे यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. या प्रदर्शनात ग्रामीण व शहरी मिळुन एकुण 20 बचत गटांनी त्यांचे स्टॉल लावले आहेत, यामध्ये दिवाळी निमित्त विविध प्रकारचे मातीचे दिवे, शोभेच्या वस्तु आकाश कंदील, साडया, मुलींचे व मुलांचे डेस, विविध प्रकारचे झाडु, तोरणे, आवळयाचे विविध उत्पादने, विविध मसाले, दिवाळीचा पुराळ, पोषक गावराण तूणधान्य, हर्बल प्रोडक्ट, उटणे, चकली चिवडा तसेच खादयपदार्थांचे निवडक स्टॉल लावण्यात आलेले आहे.
बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरु झालेले आहे, तसेच महिला सक्षमीकरणाकरीता राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना व बँक कर्ज महिला बचत गटांकरीता कमी व्याजदराने उपलब्ध आहे. याचा बचत गटांनी लाभ घ्यावा, नाबार्ड मार्फतसुद्धा बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या करीता रुरल मार्ट योजना जालन्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातुन अंबड आणी परतुर सिएमआरसी मार्फत राबविण्यात येत आहे, या प्रदर्शनाचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. क्षीरसागर यांनी या प्रसंगी बोलताना केले.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. धोंगडे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ, जालनाचे सर्व कार्यक्रम व उपक्रम स्तुत्य असुन बचतगटांच्या महिलांना प्रेरणा देणारे आहेत, असे सांगून शासनाच्या विविध योजनांची प्रचार-प्रसिध्दी माहिती कार्यालयामार्फत केली जाते. महिला बचतगटांच्या यशोगाथांनाही प्रसारमाध्यमातून निश्चितपणे प्रसिध्दी दिली जाईल. महिलांनीही बचत गटांमार्फत उत्पादीत वस्तुंची चांगल्या प्रकारे प्रसिध्दी केल्यास त्यांच्या उत्पादनांच्या मागणीत वाढ होऊन आर्थिक उत्पन्नात भर पडेल.
माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते म्हणाले की, बचत गटांतील महिलांना उदयोग व्यवसाय करतांना बाजारपेठेची समस्या मोठया प्रमाणात येते, उत्पादनांची विक्री करताना संभाषण कौशल्य, भाषा शैली, संयम आणि चिकाटी इत्यादी गोष्टी अंगी असाव्यात याकरीता प्रदर्शनाचे हे व्यासपीठ महिलांना उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे, सर्वात महत्वाचे महिलांच्या कला गुणांना वाव देण्याकरीता विविध प्रकारच्या बैठका, अभ्यासदौरे महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजीत करण्यात येतात, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास जया नेमाने, धनंजय कुळकर्णी, प्रविणकुमार कथे, रघुनाथ पंडीत, मिनाक्षी घायाळ श्रीमती, शिला मिरधे तसेच विविध विभागांचे अधिकारी व मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.