खरपुडी येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि.4
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयातंर्गत कार्यरत असलेल्या नेहरू युवा केंद्राच्यावतीने खरपुडी येथील पार्थ सैनिकी शाळेत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि.3 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला, अशी माहिती नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर, नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर व पार्थ सैनिकी शाळेचे प्रा. मोहन नेहरे आदि उपस्थित होते. यावेळी डॉ. गाडेकर व प्रा. नेहरे यांनी खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी खेळाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विकास कसा साधता येईल, यावर महत्त्वपूर्ण विचार मांडले. स्पर्धेमध्ये कबड्डी (पुरुष), खो-खो (महिला), 100 मीटर धावणे (महिला व पुरुष) आणि गोळाफेक (महिला व पुरुष) अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता.
गोळाफेक महिला गटात कोमल धुमाळ हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक कल्याणी लोखंडे हिने मिळवला. पुरुष गटात अनिकेत उबाळे प्रथम, पावन जावळे द्वितीय आणि आदित्य ढवळे तृतीय स्थानी राहिले. 100 मीटर धावणे महिलांच्या स्पर्धेत अक्षरा भानुसे प्रथम, कोमल धुमाळ द्वितीय, आणि अश्विनी थिटे तृतीय स्थानी राहिली. पुरुष गटात साईराज कोल्हे प्रथम, कृष्णा मैंद द्वितीय, तर धुरंधरे तृतीय क्रमांक मिळवला.
खो-खो (महिला) स्पर्धेत दुर्गामाता माध्यमिक विद्यालय, सोयगाव देवी, भोकरदन येथील संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर ‘आमची शाळा’ या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. कबड्डी स्पर्धेत पार्थ सैनिकी स्कूलच्या संघाने विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत सहभागी खेळाडूंना ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. खेळाडूंच्या प्रयत्नांना आणि मेहनतीला मान्यता देत प्रमुख पाहुण्यांनी त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक योगेश बावसकर, सत्येंद्र बिश्त, भैय्यासाहेब ढवळे, सतीश गाभूड यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच युवा मंडळाचे अध्यक्ष जयपाल राठोड, अशोक शिंदे, सुरज जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.