“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण” योजनांतर्गत जालना शहर महानगरपालिकेतर्फे मदत कक्ष स्थापन, महिलांना नोंदणी करण्याचे आवाहन.

जालना/प्रतिनिधी, दि 16
राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणास सुधारणा करण्यासाठी व कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबुत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास दिनांक २६.०६.२०२४ रोजीनुसार मा. मंत्रीमंडळात मान्यता देण्यात आली.
त्यानुसार सदरील योजनेची अंमलबजावणी म्हणुन जालना शहर महानगरपालिका हद्दीत एकुण ३१ ठिकाणी मदत कक्ष स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक मदत कक्षामध्ये जालना महानगरपालिकेचे ०२ लिपीक, ०२ आशा सेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच प्रत्येक ०३ मदत कक्षाचे नियंत्रणाकरिता ०१ सहाय्यक नोडल अधिकारी यांची नेमणुक करण्यात आली आहे. मदत कक्षाची यादी/एरिया खालीलप्रमाणे आहे.
१. महानगरपालिका शाळा, मुर्गी तलाव जालना, २. स्वच्छता निरीक्षक कार्यालय संभाजी नगर जालना, ३. स्वच्छता निरीक्षक कार्यालय, शिवाजी पुतळा, ४. स्वच्छता निरीक्षक कार्यालय मंगळ बाजार, ५. स्वच्छता निरीक्षक कार्यालय, जुने नगर परिषद कार्यालय, ६. मनपा शाळा आझाद मैदान, ७. मनपा शाळा चंदनझिरा, ८. आरोग्य केंद्र पाणीवेस, ९. मनपा शाळा संजयनगर, १०. मनपा शाळा नुतनवसाहत, ११. मौलाना आझाद हॉल दुखी नगर, १२. स्वच्छता निरीक्षक कार्यालय म. फुले मार्केट, १३. सभागृह विठ्ठल मंदीर यशवंतनगर,१४. मनपा शाळा एसआरपीएफ, १५. मनपा शाळा, जुनी एमआयडीसी पावरलुम, १६. मनपा शाळा ब्राहमणगल्ली, १७. मनपा शाळा कचेरी रोड, १८. मनपा शाळा नागेवाडी, १९. समाज मंदीर कन्हैय्यानगर, २०. हुतात्मा स्मारक छ. संभाजी उद्यानसमोर, २१. मनपा शाळा डबलजीन, २२. मनपा शाळा रंगार खिडकी, २३. मातोश्री लॉन्स, २४. श्री. राम मंदीर, विनकर कॉलनी व बालाजी नगर, २५. ढवळेश्वर महादेव मंदीर ढवळेश्वर, २६. मनपा शाळा हिंद नगर, २७. अग्निशमन कार्यालय, २८. डी.एड. कॉलेज नॅशनल नगर औरंगाबाद चौफुली, २९. दिनदयाळ उपाध्याय सभागृह विद्युत कॉलनी, ३०. सामाजिक सभागृह समर्थ नगर, ३१. देवावाले सभागृह अग्रसेन नगर.
मदत कक्षाव्दारे “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेचे अर्ज स्वीकारले जातील व त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येईल. अर्जासोबत खालीलप्रमाणे दस्ताऐवज देणे आवश्यक आहे.
१. आधार कार्ड (अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे)
२. अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड / १५ वर्षा पूर्वीचे मतदार
ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड/१५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र /
जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.
४. वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक.
अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत
असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
५. अर्जदाराचे हमीपत्र
६. बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे)
७. अर्जदाराचा फोटो (लाभार्थी महिलेचा)
तसेच शहरातील राजकीय पक्षाचे सन्माननीय सदस्य, माजी नगरसेवक यांनी त्यांच्या प्रभागातील लाभार्थ्यांना सदर योजनेबाबत व मदत कक्षाबाबत अवगत करावे व शहरातील पात्र लाभार्थी महिलांनी योजनेचा अर्ज त्वरीत जवळील मदत कक्षावर दस्ताऐवजासह सादर करावे असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. संतोष खांडेकर व उपायुक्त श्रीमती नंदा गायकवाड यांनी केले आहे.