
0
3
1
3
6
3


जालना/प्रतिनीधी,दि.22
शहरातील बहुतांशी भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे गॅस्ट्रो, डेंग्यूचे रुग्ण संख्येत दररोज भर पडत असल्याचे निदर्शनास आणून देत आ.कैलास गोरंटयाल यांनी आज सोमवारी आक्रमक भूमिका घेवून आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांना जाब विचारला. येत्या रविवार पर्यंत आवश्यक ते पाऊल न उचलल्यास मनपासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील आ. कैलास गोरंटयाल यांनी यावेळी दिला.
जालना शहरातील बहुतांशी भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छ्तेकडे दुर्लक्ष होत असून यातून अनेकांना गॅस्ट्रो, डेंग्यू सारख्या आजारांना सामोरे जावे लागत असून तशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आ.कैलास गोरंटयाल यांनी आज सोमवारी दुपारी माजी नगरसेवक,पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह जालना महानगर पालिकेत दाखल होत आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. घंटा गाड्या, कामगार, कर्मचारी अशी सर्व यंत्रणा असूनही शहरातील स्वच्छ्तेच्या कामांकडे दुर्लक्ष का ? होत आहे असा सवाल उपस्थित करून आयुक्त खांडेकर यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. मनपा झाल्यानंतर आयएएस अधिकारी येतील, विकासाची कामे मार्गी लागतील, विकास कामांना गती मिळेल अशा वल्गना मनपाचे समर्थन करणाऱ्यांनी त्यावेळी केल्या होत्या. मात्र, विकास तर सोडाच स्वच्छ्ता, पाणी आदी मूलभूत सुविधा देखील मनपा देत नसल्याचे चित्र दिसून येत असल्याचा आरोप करून मनपाचे पुन्हा नगर पालिका किंवा ग्राम पंचायत मध्ये रुपांतर करावे अशी मागणी आ. कैलास गोरंटयाल यांनी यावेळी केली. शहरातील स्वच्छ्तेच्या संदर्भात सुजाण नागरिक विचारणा करतात त्यावेळी लेबर नाही, घंटा गाड्या असल्या तरी डिझेल नाही अशी काही तरी कारणं पुढे करून संबंधित कर्मचारी केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे मनपा आयुक्त खांडेकर यांच्या निदर्शनास आणून दिले. स्वच्छ्तेसाठी लागणारी सर्व यंत्रणा मनपाकडे असतांना सदर कामाकडे होत असलेले दुर्लक्ष बरोबर नाही. येत्या आठ दिवसांत स्वच्छतेच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष देवून हा प्रश्न मार्गी लावावा. नसता येत्या सोमवारी जालना मनपा समोर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत त्यानंतरही परिणाम न झाल्यास मनपा आयुक्तांच्या दालनात शहरातील घान टाकण्यात येईल आणि जालना शहर बंदचेही आवाहन करण्यात येईल असे आ. कैलास गोरंटयाल यांनी यावेळी स्पष्ट केले.दरम्यान, मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना आ. गोरंटयाल यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. स्वच्छतेच्या संदर्भात असलेल्या तक्रारींचा निपटारा तात्काळ केला जाईल अशी ग्वाही आयुक्त खांडेकर यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, काँग्रेस अनुसूचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांची उपस्थिती होती. यावेळी शिष्टमंडळात माजी नगरसेवक महावीर ढक्का, रमेश गौरक्षक,जगदीश भरतीया, जीवन सले, विनोद रत्नपारखे, वाजेदखान पठाण, सय्यद अझहर, अरुण मगरे, संजय भगत, नजीब लोहार,आरिफ खान, विनोद यादव, बालाजी रोडे, राधाकिसन दाभाडे, आर.एम.खान, संदीप खरात, वीणाताई सामलेटी, शिक्षादेवी ढक्का, संगीता पांजगे, सौ.पूनम राज स्वामी, किशोर गरदास, वैभव उगले, प्रीती कोटकोंडा,विक्की वाघमारे,मोहम्मद मोमीन,अशोक सरवडिकर, करण जाधव, छोटू चित्राल, गोपाल चित्राल यांच्यासह अन्य पदाधिकारी,कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
————————————————————-
माजी नगरसेवकांनी वाचला तक्रारींचा पाढा
मनपा आयुक्तांना भेटण्यासाठी आलेल्या आ. कैलास गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळातील माजी नगरसेवकांनी स्वच्छ्ता निरीक्षक, घंटा गाड्या, स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला. महावीर ढक्का,रमेश गौरक्षक,वाजेदखान पठाण,जीवन सले, विनोद रत्नपारखे, आरेफ खान, सय्यद अझहर आदींनी या चर्चेत भाग घेवून आपापल्या भागातील समस्या मांडून त्याकडे मनपा आयुक्तांचे लक्ष वेधले. घंटा गाड्या प्रभागातील कचरा संकलन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या का ? खाजगी रुग्णालय, पावभाजी सेंटर आणि व्यावसायिकांचा कचरा संकलन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करून मनपा आयुक्तांना माजी नगरसेवकांनी चांगलेच धारेवर धरले. या तक्रारींची दखल घेऊन मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी यावेळी उपस्थित स्वच्छ्ता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करत स्वच्छ्तेची कामे जबाबदारीने पार पाडण्याचे आदेश दिले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
3
1
3
6
3