प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दूरदृष्यप्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी थेट संवाद; जालना शहरात विकसित भारत संकल्प यात्रेस लाभार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जालना/प्रतिनिधी,दि.18
केंद्र शासनाकडून सर्वसामान्य माणसाला केंद्रीत ठेवून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विविध योजनांचा लाभ मिळालेल्या विविध राज्यातील लाभार्थ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विकसित भारत संकल्प यात्रेचे जालना येथील जुन्या तहसील कार्यालय परिसरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, पदाधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास लाभार्थी, नागरिकांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर ढोबळे यांनी केले तर आभार महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी मानले.
कार्यक्रमस्थळी किसान क्रेडिट कार्ड, किसान सन्मान योजना, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना, प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र, आयुषमान भारत योजना, गरीब कल्याण योजना, जन धन योजना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आदीबाबत माहिती देण्यात आली तसेच या ठिकाणी प्रधानमंत्री जनऔषधी परियोजना, कृषी, नाबार्ड, महाराष्ट्र बँक (जनधन योजना), उज्वला योजना, आधार नोंदणी/नूतनीकरण, आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत ( प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ), पशुधन विकास ( पशुधन विषयक किसान क्रेडिट कार्ड), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बचत गट आदी स्टॉल लावण्यात आले होते. जिल्ह्यातील गावागावात जाऊन केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिम दि. 26 जानेवारी, 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे.