जिल्ह्यात सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम

जालना/प्रतिनिधी,दि.10
जिल्ह्यात सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम येत्या 10 ते 22 मार्च, 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जालना जिल्ह्यातील अतिजोखमीच्या भागात लोकसंख्येचे सर्वेक्षण प्रत्यक्ष घरोघरी जाऊन घरामधील सर्व सदस्यांची क्षयरोग आजाराबाबतची तपासणी आशा व पुरुष स्वयंसेवक यांच्याव्दारे करण्यात येणार आहे.
जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील ग्रामिण व शहरी भागातील अतिजोखमीच्या घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार असुन ग्रामिण व शहरी भागासाठी एकुण 121 पथकांची निर्मिती करण्यात आली असुन, सदर पथकात 242 आशा व पुरुष स्वयंसेवक यांच्याव्दारे सर्वेक्षण करण्यात येणार असुन सदर मोहिमेचे 24 पर्यवेक्षकांव्दारे पर्यवेक्षण करण्यात येणार असुन सदर मोहिमेचे तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी हे संनियंत्रण करणार आहेत. सर्वेक्षणासाठी जालना जिल्हयातील एकुण 2 लाख 42 हजार 332 लोकसंख्या सर्वेक्षणासाठी घेण्यात आली आहे. सदर मोहिमेदरम्यान आशा, पुरुष स्वयंसेवक घरोघरी जाऊन ज्या व्यक्तींना दोन आठवडयापेक्षा अधिक कालावधीचा खोकला, दोन आठवडयापासुन येणार ताप, वजनात घट, भुक न लागणे, मानेवर व इतरत्र गाठी येणे इत्यादी लक्षणे असतील अश्या व्यक्तींची तपासणी करण्यात येणार असुन लक्षणे आढळुन आल्यास सदर व्यक्तीची तात्काळ धुंकी नमुने/क्ष-किरण/नॅट तपासणीकरुन सदर तपासणीमध्ये क्षयरोग आढळुन आल्यास रुग्णास क्षयरोगावरील औषधोपचार सुरु करण्यात येणार आहे. तरी घरोघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन डॉ जिल्हा क्षयरोग अधिकारी जी. एम. कुडलीकर,जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.