जालना येथे मंजूर असलेले शासकीय मुलींचे आयटीआय नवीन ट्रेडसह तातडीने सुरू करावे यासाठी येत्या २७ जूनपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचा इशारा आ.कैलास गोरंटयाल यांनी दिला आहे.
राज्य शासनाच्या वतीने राज्यात मुलांसाठी असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय ) धर्तीवर मुलींसाठी देखील स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय ) सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर सात वर्षांपूर्वी जालना येथे मुलींसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मंजूर करण्यात आलेली असून सदर संस्था कार्यान्वित करण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारच्या हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. मुलांप्रमाणे मुलींनी देखील तांत्रिक कौशल्य आत्मसात करून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे यासाठी तत्कालीन राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेत जालना येथे मुलींसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मंजूर केले आहे. मात्र, सदर प्रशिक्षण संस्था आजपर्यंत कार्यान्वित होऊ शकली नाही. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाची उदासीन भूमिका यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप आ.कैलास गोरंटयाल यांनी केला आहे. राज्यात अन्य जिल्ह्यात मुलींसाठी मंजूर करण्यात आलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) ज्या पद्धतीने कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर जालना येथे मंजूर करण्यात आलेले मुलींचे आयटीआय नवीन ट्रेडसह तातडीने सुरू करून मुलींवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी तसेच या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचा इशारा आ.कैलास गोरंटयाल यांनी दिला आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा