pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ज्येष्ठ नागरिकांना माहिती, मदत आणि तक्रारींसाठी 14567 राष्ट्रीय हेल्पलाईन

0 3 2 2 2 2

जालना/प्रतिनिधी,दि.30

ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत 14567 क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन – एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या टोल फ्री हेल्पलाईनच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार इत्यादींची माहिती व मदत देण्यात येत आहे.
राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, राज्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याची ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्याद्वारे चालविण्यात येत आहे. ही हेल्पलाईन टोल फ्री स्वरुपात असून, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व ज्येष्ठ व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यासाठी माहिती, मार्गदर्शन आणि भावनिक आधार प्रदान करीत आहे. तसेच बेघर वृद्ध व्यक्तीस मदत म्हणून वृद्धाश्रमांमध्ये निवारा देण्यात येत आहे. आणि त्यांना पुन्हा त्यांच्या कुटूंबियांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबतच्या प्रतिसाद प्रणालीने (रिस्पॉन्स सिस्टम) राज्यात संबंधित क्षेत्रात काम सुरु केले आहे.
या हेल्पलाइनच्या सेवा देशभरात वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व वयोवृद्धांना ही सेवा उपलब्ध करण्यासाठी जनसेवा फाऊंडेशनच्या जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधींनी सर्व जिल्ह्यात काम सुरू केले आहे.
जिल्ह्यांमध्ये एल्डर लाईन क्रमांक 14567 च्या सेवा वाढविण्यासंदर्भात या राष्ट्रीय हेल्पलाईनच्या कार्यकारिणी सदस्यांना प्रशासनाने सहकार्य करुन हेल्पलाईनची माहिती व जनजागृती करण्याबाबत राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने परिपत्रक जारी केले आहे.
हेल्पलाईनवर मिळणाऱ्या सेवा ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता, निदान, उपचार, निवारा- वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक ईत्यादीची माहिती दिली जाते. वैयक्तिक आणि कौटुंबिक दोन्ही स्तरावरील कायदे विषयक प्रकरणी, मालमत्ता, शेजारी इ. विवाद निराकरण, आर्थिक, निवृत्तीवेतन, शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले जाते. चिंता निराकरण, नातेसंबंध विषयक व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण इ. विषयी जीवन व्यवस्थापनाबाबत भावनिक समर्थन दिले जाते. बेघर, अत्याचारग्रस्त वृद्ध, ज्येष्ठ व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर मदत केली जाते.
हेल्पलाइनची कार्यप्रणाली एल्डर लाईन 14567 हा क्रमांक टोल फ्री आहे. एल्डर लाईनचे कार्य आठवड्यातून सर्व दिवस सुरु असते. हेल्पलाइनची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत असते. वर्षातील 362 दिवस सेवा सुरु असते (26 जानेवारी, २ ऑक्टोंबर, व १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी पूर्ण बंद असते.) हेल्पलाइनसाठी सर्व जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधी नियुक्त केलेले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 2 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे