राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक अभिसरणाचा पाया रचला — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना/प्रतिनिधी,दि. 26
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी क्रांतिकारक व पुरोगामी निर्णय घेतले. त्यांनी केलेले शिक्षणविषयक कार्य महनीय आहे. सामाजिक विषमता कमी करण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांनी सामाजिक अभिसरणाचा पाया रचला, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती (दि. 26 जून) दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. यानिमित्ताने सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाच्यावतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी बोलत होते.
कार्यक्रमास समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रदिप भोगले, मुख्याध्यापिका सूर्यकला गोसावी, गृहपाल रघुनाथ खेडेकर, अप्पासाहेब होरशिळ, रामेश्वर कर्दळे, श्रीमती पाटोळे आदींसह कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मत्स्योदरी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजयकुमार कुमठेकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक कार्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा संघटक नशाबंदी मंडळाचे बिस्मिल्ला सय्यद यांनी अंमली पदार्थाच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करुन या विषयाचे पोस्टर्स कार्यक्रमात वाटप केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती धनादेशचे पल्लवी डोळसे, बोर्डे किरण या विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. मार्च-2024 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेत शासकीय निवासी शाळा, बदनापूर येथील आर्यन गायकवाड, अदित्य कांबळे, यशराज शिंदे तसेच शासकीय निवासी शाळा, जालना येथील प्रज्ञा अरविंद सोनकांबळे, मिरा नवनाथ बोंडे, अरुणा गोवर्धन खरात व शासकीय निवासी शाळा, भोकरदन येथील जिवन सुरडकर, धम्मपाल सुरडकर व पवन मोरे या अनुक्रमे प्रथम, द्वितिय व तृतिय क्रमांक मिळावलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात आले. प्रस्ताविक अतिश ससाने यांनी तर सुत्रसंचालन डॉ. दिलीप गिरीले यांनी केले. आणि उपस्थितांचे आभार गणेश अंबुरे यांनी मानले.