-जालना लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्र परिसरात आवश्यक सुविधा व्यवस्थितपणे उपलब्ध कराव्यात — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
पार्किंग, सुरक्षा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वाहतूक, मिडिया कक्ष व मतमोजणी केंद्रातील अंतर्गत व्यवस्था चोख ठेवाव्यात

जालना/प्रतिनिधी,दि.31
18-जालना लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवार, दि. 4 जून 2024 रोजी होणार आहे. या अनुषंगाने मतमोजणी केंद्राच्या परिसरात आवश्यक व्यवस्था चोख ठेवाव्यात. कुठल्याही प्रकारे कुणाचीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. पार्किंग, सुरक्षा, पिण्याचे पाणी, भोजन, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, मिडिया कक्षातील व्यवस्था, मतमोजणी केंद्रातील अंतर्गत व्यवस्था, मनुष्यबळ या सर्व बाबींचे काटेकोरपणे नियोजन करुन तेथे लागणाऱ्या सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते, बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्यासह मतमोजणी केंद्र परिसरात विविध सुविधा उपलब्धतेसाठी नियुक्त नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, मतमोजणीसाठी प्रशासन जय्यत तयारी केली आहे. दि.4 जून 2024 रोजी जालना येथील मे. सरस्वती अॅटो कम्पोनन्टस प्रा.लि. प्लॉट नंबर बी-8/1 जालना फेज- 3 एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया येथे मतमोजणी होणार आहे. सकाळी 8.00 वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतमोजणी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित यंत्रणांना जबाबदारी देण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारे त्याठिकाणी आवश्यक सुविधांची उणिव भासणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.
मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी, उमेदवारांचे प्रतिनिधी, पत्रकार, सुरक्षारक्षक यांच्यासाठी आवश्यक सुविधा नोडल अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे उपलब्ध करुन द्याव्यात. याशिवाय मतमोजणी केंद्राबाहेर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीसांनी खबरदारी घ्यावी. आरटीओंनी पार्किंग व वाहतूक व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन करावे. महानगर पालिकेने पाणी व स्वच्छतेबाबत दक्षता घ्यावी. संबंधितांनी पिण्याचे पाणी, भोजन, चहापान या सुविधा वेळेवर उपलब्ध कराव्यात. कुठल्याही प्रकारे कुणाचीही गैरसोय होणार नाही, याची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी.