शेतकऱ्याला लुटणारी टोळी मौजपुरी पोलिसांकडून जेरबंद

विरेगाव / गणेश शिंदे,दि. 9
शेतकऱ्याचे दीड लाख रुपये घेऊन पळून जाणाऱ्या चोरट्यांना मौजपुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. फिर्यादी कापूस विक्रीसाठी ट्रॅक्टरमध्ये भरून वाटूर (ता. परतूर) येथील शेषनारायण जिनिंग येथे गेले होते. त्यांनी कापूस विक्री करून आलेले दीड लाख रुपये एका पिशवीत ठेवले. दुचाकीवरून गावी वखारीकडे जात असताना, पाठीमागून पाठलाग करणाऱ्या चोरट्यांनी शिंगाडे पोखरी फाट्याजवळ चालू गाडीवरून फिर्यादीच्या हातातील बॅग हिसकावून फरार झाले. फिर्यादीने मौजपुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी शोध सुरू केला. चोरटे शेषनारायण जिनिंग, वाटूर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यात एक संशयित कृष्णा शिंदे असल्याचे स्पष्ट झाले. तो डावरगाव (ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) येथील आहे. त्याच्याकडे स्कॉर्पिओ आहे. आम्ही सिंदखेडराजा येथे आरोपींच्या शोधासाठी जात असताना, आरोपींना पोलिस त्यांच्या मागावर असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सिंदखेडराजा, जि. बुलडाणा येथून पळ काढला. समृद्धी महामार्गाने पळून जात असताना, त्यांचा पाठलाग करून त्यांना जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून पकडले.
कृष्णा रामदास शिंदे, विठ्ठल केशन पास्टे (रा. पारेगाव, ता. जि. जालना), अनिकेत शहाजी खरात (रा. बुध्दवाडा, ता. सिंदखेडराजा), गजानन रंगनाथ झाडे (रा. डावरगाव) असे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेतले. स्कॉर्पिओ वाहनामध्ये सीटखाली लपवून ठेवलेले ७० हजार रुपये आणि कृष्णा रामदास शिंदे याने त्याच्या घरी लपवून ठेवलेले ७० हजार रुपये, असे १,४०,००० रुपये जप्त केले. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले चार मोबाइल, किंमत ४०,००० रुपये, आणि वाहन, असा ७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. सपोनि मिथन घगे आणि पोउपनि विजय तडवी तपास करत आहे