लोकसभेसाठी भाजपा १०० हुन जास्त आकडा पार करू शकत नाही. -उद्धव ठाकरे
उरण मधील जनसंवाद सभेत भाजप व शिंदे गटावर उद्धव ठाकरेनी साधला निशाला ; भाजप नेत्यांचा व शिंदे गटाचा घेतला समाचार.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.5
माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो आज आपण या जनसंवाद मेळाव्याला कोणतेही निवडणूक किंवा कोणतेही स्वार्थ नसताना देखील मोठया प्रमाणात एकत्र आलात. बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले, कट्टर निष्ठावंत शिवसैनिक एवढ्या मोठया प्रमाणात आज एकत्र दिसले हि गर्दी बघून निश्चित भविष्यात उरण विधानसभा मतदार संघात आमदार पदाचे उमेदवार मनोहरशेठ भोईर व मावळ लोकसभा मतदार संघात संजोग भिकू वाघेरे पाटील बहुमताने निवडून येतील. त्यामुळे या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्यासाठी जात पात धर्म बाजूला ठेवून देश वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र या आणि गद्दारांना फेकून दया असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उरण येथे केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल खालापूर उरण या तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे कार्याध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या झंजावाती दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उरण तालुक्यात नवीन शेवा मैदान द्रोणागिरी नोड उरण येथे भव्य दिव्य अशा जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जनसंवाद मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख यांनी उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे,शिवसेना नेते सचिन अहिर, अनंत गिते, मावळ लोकसभा मतदार संघांचे संभाव्य उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील,शिवसेना नेत्या ज्योतीताई ठाकरे,शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर,काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील,काका पाटील, वंचित बहुजन आघाडीचे नेते राजाराम पाटील,शिवसेनेचे संपर्क प्रमुख दिपक भोईर,शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात अर्थातच जनसंवाद सभेत भाजप व शिंदे सरकारच्या विविध भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढले. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की मला अभिमान आहे की ठाकरे कुटुंबात जन्मलो. आमच्या कुटुंबाला राजकीय वारसा आहे. आमच्या कुटुंबाला एतिहासिक वारसा देखील आहे. माझ्यावर घराणेशाहीचा नेहमी आरोप होतो. मात्र भाजपची घराणेशाही कोणाला दिसत नाही. देशात हुकूमशाही लादली जात आहे. मोदी वेगवेगळे कायदे करून देशाचे मोठया प्रमाणात नुकसान करत आहेत. अमित शहा, मोदी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांचा बळी घेतला आहे. या भाजपा पक्षाचा व त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा देश स्वातंत्र्य चळवळीत कोणतेही योगदान नाही.आम्ही घराणेशाही चालवत नाहीत तर लोकशाही चालवतो म्हणून आमच्यासोबत आज मुस्लिम बांधवहि लोकशाही वाचविण्यासाठी शिवसेनेसोबत आले आहेत. जनसंघने ११ महिने मुस्लिम लीग सोबत युती केली आणि आम्हाला हिंदुत्ववाद शिकवितात. आम्ही काँग्रेस सोबत गेलो पण हिंदुत्ववाद सोडला नाही. जात पात धर्म बाजूला ठेवून देश वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र या. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा १०० हुन जास्त जागा जिंकू शकत नाही.आज संपूर्ण भारतात मोदी व भाजपा विरोधात संतापाची लाट पसरली आहे. आज वेगवेगळे कायदे बदलविले जात आहेत. गोर गरिबांवर अत्याचार होत आहेत. हे सर्व उघड्या डोळ्यांनी सर्वांना दिसत आहे. भाजप अत्याचार करत आहे हे उघड उघड दिसते. इतर पक्षातील लोक, नेते पदाधिकारी आयात करून त्यांना पक्षात घेतले जात आहे. त्यामुळे भाजपा पक्षाने निष्ठावंत व प्रामाणिक एकनिष्ठ पदाधिकारी कार्यकर्त्यांवर खूप मोठया प्रमाणात अन्याय केला आहे. अनेक वर्षांपासून निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हा अपमान आहे.आपण सर्वांनी एकत्र येत येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेत भाजपला पोहचू द्यायचे नाहीत. आता मिळालेल्या संधीचे सर्वांनी सोन करा. साधी मुंबई महानगर पालिका जिंकू शकत नाही आणि देश जिंकायला निघाले. आज भाजपा कडे ८००० कोटीहुन जास्त निधी जमा झाला आहे. भाजपकडे एवढ्या मोठया प्रमाणात निधी आला कुठून ? इडी, तसेच विविध जप्ती, छापा टाकून कंपनी वर दबाव टाकून भाजपने हा निधी मिळविला आहे. हि निधी म्हणजे भ्रष्टाचार आहे.राज्यात शाळा, कॉलेज, हॉस्पिटल यांची परिस्थिती बेकार आहे. वेगवेगळ्या सेवा सुविधा उपलब्ध नाहीत. अमली पदार्थचे प्रमाण राज्यात वाढले आहे. याला केंद्र व राज्य सरकार कारणीभूत आहे. आम्ही कोणत्याही निवडणुकीला घाबरत नाहीत. शिवसेनेचे चिन्ह गेले तरी आम्ही नाव मात्र घेऊ देणार नाही. शिवसेनेचे नाव कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही.२५ वर्षे भाजप सोबत युती केली,२५ वर्षे भाजपची पालखी वाहिली आता हि पालखी वाहणार नाही. आता शिवसेनेला अंकुर फुटला आहे. नासकी पाने, खराब पाने गळून पडली आहेत. दुसरीकडे गेली आहेत. एखाद्या वृक्षाला अंकुर फुटते व ते झाड जसे टवटवीत दिसते तसे खराब लोक शिकसेनेतून निघून गेल्याने आता शिवसेनेने नव्याने जन्म घेतला आहे. शिवसेनेला नव्याने अंकुर फुटले आहे. यापुढील उरण विधानसभा मतदार संघांचे उमेदवार मनोहरशेठ भोईर तर मावळ लोकसभा मतदार संघांचे उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील हेच असतील त्यांना प्रचंड मताने विजयी करा.असे आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद सभेत सर्वांना संबोधित केले.
तत्पूर्वी उद्धव साहेब ठाकरे यांच्या आगमनापूर्वी विविध पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले.
शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या मनोगतात त्यांनी माजी खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर तसेच विद्यमान आमदार महेश बालदी यांच्यावर जोरदार प्रहार केला.श्रीरंग बारणे यांनी उरण जेएनपीटी मध्ये पार्किंगचे काम घेतले. याच्या पलीकडे त्यांनी कोणतेही काम केले नाही. विद्यमान आमदार महेश बालदी हे लोकांना फसवून सत्तेवर आले आहेत. या गद्दारांना त्यांची जागा दाखवा असे परखड मत संतोष ठाकूर यांनी व्यक्त केले.
आजची लढाई हि जनता जनार्दणाची आहे. जेंव्हा लढाई जनतेच्या हातात असते तेव्हा ती लढाई शंभर टक्के यशस्वी होते. मोदी आणि शहा सर्वांना संपवायला बसले आहेत. राज्यात आमदार सुरक्षित नाहीत. भर पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार होते. या राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत. युवकांना रोजगार नाही. हे अन्याय आम्ही मुळीच सहन करणार नाही. पुढील आमदार मनोहरशेठ भोईर, खासदार संजोग पाटील हेच असतील इंडिया आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना नम्र विनंती सर्वांनी पेटून उठा. अत्याचार थांबवायचे असतील तर हा लढा लढावे लागेल हि लढाई निष्ठावंतांची आहे. गद्दारांना त्यांची जागा दाखवील्याशिवाय राहणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी व्यक्त केले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनी आपल्या मनोगतातून महेश बालदी यांच्यावर जोरदार प्रहार केला. महेश बालदी यांनी उद्धव ठाकरे यांना निवडणुकीत हरवून दाखवितो असे म्हटले होते मात्र घारापुरी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी जरी महेश बालदी उभे राहिले तर त्यांचे डिपॉजिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही. महेश बालदी हे साधे ग्रामपंचायत निवडणूक जिंकू शकत नाही. त्यामुळे गद्दारांना त्यांची जागा दाखविणार असे परखड मत उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर यांनी व्यक्त केले.
शिवसेना नेत्या ज्योती ठाकरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जनतेशी कोणतेही संवाद न साधता बंद खोलीतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात द्वारे जनतेशी संवाद साधतात. हे मन की बात खोटं आहे. शिवसेनाचा चिन्ह चोरले, पक्षातील नेते चोरले तरीही शिवसेना पक्ष संपला नाही. उद्धव साहेब हे प्रत्येकाच्या मनात आहेत.महिलांना उज्वला गॅस योजने अंतर्गत अगोदर स्वस्तात ४५० रुपयात गॅस सिलेंडर होते ते सिलेंडर आज ११५० रुपयावर गेला आहे. एकीकडे योजना दाखवायच्या व दुसरीकडे त्या योजना हिसकावून घ्यायचा हि भाजपची भ्रष्ट निती आहे. डोळे उघडण्यासाठी हा जनसंवाद मेळावा आहे. भाजपा फक्त घोषणाचा पाऊस करते. देत मात्र काही नाही असे मत ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी श्रीरंग बारणे हे फक्त पार्किंगच्या कामाला उरण मध्ये येतात. बाकी ते कोणतेही काम करत नाहीत. विद्यमान आमदार महेश बालदी यांना सत्तेचा माज आला आहे. पैशाचा माज आला आहे हा माज सर्वांनी उतरवायला पाहिजे. आपण आगरी कोळी कराडी समाजाने आगरी कोळी कराडी समाजातील उमेदवारलाच निवडून द्यायला पाहिजे पण तसे न राहता मारवाडी आमदार म्हणून निवडून येतो. हि दुर्दैवाची बाब आहे. असे परखड मत प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.
उपऱ्या आमदारांकडे आता मत राहिलेले नाही. महेश बालदीकडे आता मते राहिलेले नाहीत. मी माझा सर्व पगार अपंगाना देतो. कोरोना मध्ये महेश बालदी हे उंदरा सारखे बिळात लपून बसले होते. उद्धव साहेब ठाकरे व महेश बालदी यांच्यात निवडणूक झाल्यास महेश बालदी यांचा १ लाख मतांनी निश्चित पराभव होईल. आगरी कोळी कराडी समाजाने आता मारवाडी आमदार निवडुन न देता स्थानिक मराठी आमदार निवडून द्यावा असे आवाहन शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी केले.
शिवसेना नेते अनंत गिते यांनीही मनोगत व्यक्त करताना पुढील आमदार मनोहरशेठ भोईर तर पुढील खासदार संजोग पाटील हेच असतील. बहुमताने हेच उमेदवार निवडून येथील असा आत्मविश्वास व्यक्त केला.सदर कार्यक्रमाचे उत्तम असे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक अतिष पाटील यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.एकंदरीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )च्या जनसंवाद सभेला शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचा यावेळी उत्तम प्रतिसाद पहायला मिळाला. पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठया प्रमाणात संख्या पाहावयास मिळाली. विशेष म्हणजे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे स्वतः च्या मर्जीने, स्व खुशीने शिवसेना पक्षाच्या प्रेमापोटी येथे आल्याचे दिसले.भाड्याने आणलेले किंवा पैसे देऊन आणलेले एकही कार्यकर्ता येथे दिसला नाही.