
जालना/प्रतिनिधी,दि.7
जालना शहरापासून १० कि.मी. अंतरावरील सामनगांव येथील पडुळ यांच्या शेतशिवारातील शेततळ्यात बुडून चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना ६ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे २ सख्खे भावंडे ओमकार कृष्णा पडूळ (६ वर्ष), भागवत कृष्णा पडूळ (९ वर्ष), बाप-लेक भागवत जगन्नाथ इंगळे (३२), युवराज भागवत इंगळे (५ वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. जालना तालुक्यातील सामनगांव शिवारातील पडुळ यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गावातील भागवत कृष्णा पडुळ, ओंकार कृष्णा पडूळ, युवराज भागवत इंगळे हे पोहण्यासाठी गेले असता, खोल पाण्यात गेले.
यावेळी आरडा-ओरड झाला असता, युवराज इंगळे याचे वडिल भागवत जगन्नाथ इंगळे वय (३५) यांनी लगेच शेततळ्याकडे धाव घेत तळ्यात उतरून या बालकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु सदरील मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचाही मृत्यू झाला. दरम्यान शेततळ्यातील पाणी काढून देण्यासाठी तळेही फोडण्यात आले परंतू तोपर्यंत वेळ झाला होता.त्यामध्ये चारही मृतदेह हाती लागले. कृष्णा पडूळ यांना भागवत कृष्णा पडुळ, ओंकार कृष्णा पडुळ अशी २ मुले होती. तर भागवत जगन्नाथ इंगळे पडुळ यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करीत होते. त्यांना ४ अपत्य होती. त्यापैकी युवराज इंगळे हे त्यांचे अपत्य होते. सदरील मृत चौघांना तळ्यातील पाण्याच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जालना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी हजर होते.