
0
3
2
1
8
0


जालना/प्रतिनिधी,दि.23
येथील संत गाडगेबाबा शॉपिंग कॉम्प्लेक्स.बसस्टँड रोड जालना येथे थोर समाजसुधारक राष्ट्रसंंत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी थोर समाजसुधारक राष्ट्रसंंत गाडगे बाबांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. राष्ट्र संत गाडगे बाबा यांचा जन्म शेंडगाव ता. दर्यापूर जि. अमरावती येथे दि. 23 फेब्रुवारी 1876 झाला. राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वर्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे.’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. गाडगे महाराजांची चरित्र ंयावेळी उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी परिट धोबी समाजाचे अध्यक्ष श्री गणेश सर्वे, सुरेश कुंडलीकर, संतोष चौधरी, विजेंद्र कोंडेकर, नागेश सर्वे, नरेश कुंडलीकर, सौ. लताबाई कोपरेकर आदींची उपस्थिती होती.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
3
2
1
8
0