जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ

जालना/प्रतिनिधी,दि.31
जिल्हयात विविध लोकोपयोगी विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जातो. या निधीतून कामे गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच हा निधी वेळेत खर्च होईल, याची दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी. तसेच प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिले.
जिल्हा नियोजनच्या सभागृहात आज जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 व 2022-23 मधील कामे आणि सन 2023-24 साठी प्रशासकीय मान्यतेचे परिपूर्ण प्रस्ताव, स्पील निधी याबाबत जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आढावा घेतला. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ म्हणाले की, सन 2021-22 व 2022-23 मधील जी स्पीलमधील प्रलंबित कामे आहेत, ती तातडीने पूर्ण करावीत. जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागांनी याबाबत दक्षता घेऊन कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पध्दतीने पूर्ण करावीत. निधी अखर्चित राहता कामा नये. खर्चाच्या सर्व नोंदी आय-पास प्रणालीवर प्राधान्याने अपलोड कराव्यात. सन 2023-24 या चालू वर्षातील निधी वेळेत खर्च करण्यासाठी विभागप्रमुखांनी प्रस्तावास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन पुढील कामाची प्रक्रीयाही सुरु करावी. जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी खर्च होईल, याची सर्वच विभागप्रमुखांनी गांभीर्याने दक्षता घ्यावी. प्रलंबित कामांचा व खर्चाचा नियमितपणे आढावा घेतला जाईल, असेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेसह सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला.