जालना शहरात 28 व 29 डिसेंबरला “आंतरराष्ट्रीय भरड धान्य जनजागृती महोत्सव” – जेईएस महाविद्यालयात मेळाव्याचे आयोजन
- विविध स्पर्धांच्या माध्यमातून भरड धान्याचा प्रचारप्रसार - मेळाव्याच्या ठिकाणी भरड धान्य विक्री, खाद्यपदार्थांचे स्टॉल - विविध मार्गदर्शकांच्या व्याख्यानाचे आयोजन - विद्यार्थ्यांची निघणार भव्य रॅली
जालना/प्रतिनिधी,दि.27
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जालना शहरातील जेईएस महाविद्यालय परिसरात दि. 28 व 29 डिसेंबर 2023 रोजी भव्य “आंतरराष्ट्रीय भरड धान्य जनजागृती महोत्सव-2023”चे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उदघाटन केंद्रीय रेल्वे व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते तर विशेष निमंत्रित पालकमंत्री अतुल सावे हे राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय जाधव,आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राजेश टोपे, आमदार राजेश राठोड,आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त अर्जून भुजबळ यांची राहणार आहे. तसेच विनीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जी.आर.कापसे, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त दयानंद पाटील, जालना एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया व सचिव श्रीनिवास भक्कड, प्राचार्य डॉ.गणेश अग्निहोत्री, व्यापारी महासंघ अध्यक्ष सतीश पंच आणि हॉटेल असोशिएशन अध्यक्ष विनीत साहनी हे राहणार आहेत.
आंतरराष्ट्रीय भरड धान्य जनजनगृती महोत्सव-2023 चा समावेश व बक्षीस वितरण समारंभास अध्यक्ष म्हणून अतिरिक्त अपर जिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जी.आर.कापसे, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त दयानंद पाटील, उपजिल्हा कृषी अधिकारी डॉ.संदीप जगताप, प्राचार्य डॉ.गणेश अग्निहोत्री, व्यापारी महासंघ अध्यक्ष सतीश पंच आणि हॉटेल असोशिएशन अध्यक्ष विनीत साहनी हे राहतील.
गुरुवार दि.28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत शहरातील प्रमुख शाळेतील इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची भरड धान्याविषयी जनजागृती रॅली काढण्यात येईल. सकाळी 10 ते 11.30 यावेळेत उदघाटन कार्यक्रम पार पडेल. सकाळी 11.30 ते 12.15 या वेळेत पहिल सत्र नाशिक येथील वक्ते शशिकांत बोडखे, दुपारी 12.15 ते 1 या वेळेत दुसरे सत्र यात खरडपूरी येथील कृषी विज्ञान केंद्रातील वक्ते श्रीकृष्ण सोनूने, दुपारी 1 ते 1.45 यावेळेत सत्र दुसरे वक्ते डॉ.उमेश मोगले, आणि सायंकाळी 6.30 ते 8.30 यावेळेत जेईएस लोकरंग अंतर्गत लोकगीत, भारुड, गोंधळ, पोवाडा इत्यादीचा भव्य कार्यक्रम होईल.
शुक्रवार दि.29 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 10.45 यावेळेत सत्र तिसरे वक्ते डॉ.गणेश कुलकर्णी, सकाळी 10.45 ते 11.30 सत्र तिसरे श्रीमती सुषमा दिपवाल, दुपारी 12 ते 12.45 या वेळेत सत्र चौथे बचत गटाच्या सिताबाई मोहिते तर दुपारी 12.45 ते 1.15 यावेळेतील चौथ्या सत्रात प्रगतिशील शेतकरी यांचे व्याख्यान होईल. तसेच दुपारी 2.30 ते 3.30 यावेळेत कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल.
अन्न व औषध प्रशासन आणि जालना एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या “भरड धान्य मेळाव्या”निमित्त भरड धान्याच्या प्रचार-प्रसारासाठी विद्यार्थ्यांकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर मुख्य मेळाव्याच्या ठिकाणी दोन दिवसांत विविध कार्यक्रम होणार आहेत. या ठिकाणी भरड धान्य विक्री तसेच भरड धान्यापासून बनविण्यात आलेले विविध खाद्यपदार्थांचे सुमारे 30 स्टॉल राहणार आहेत. या स्टॉलमध्ये बचतगट, शेतकरी, धान्य व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांच्या स्टॉलचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. या सर्व स्टॉलवर भरड धान्य व या धान्यापासून बनविण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची रेलचेल राहणार आहे.या “भरड धान्य मेळावा-2023”च्या प्रचार-प्रसारासाठी आणि भरड धान्याचे महत्त्व लोकांना समजण्याकरीता पोस्टर स्पर्धा, निबंध लेखन, रांगोळी, पाककृती अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
भरड धान्य मेळावानिमित्त दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विद्यार्थ्यांची रॅली निघणार आहे. ही रॅली आरपी रोड मार्गे, कॉलेज रोड आणि जेईएस महाविद्यालय येथे जाईल. मेळाव्याच्या ठिकाणी उदघाटन, विविध मार्गदर्शकांचे व्याख्यान होणार आहे. मेळाव्याच्या परिसरातच भरड धान्य विक्री व खाद्यपदार्थांचे स्टॉल राहणार आहेत. या भरड धान्य मेळाव्याचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती सुत्रावे व द.वि. पाटील यांनी केले आहे.