जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

जालना/,प्रतिनिधी,दि.4
सन 2024-25 अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध शासकीय विभागानी योजनाकरीता केलेल्या खर्चाची माहिती घेतली. जिल्हा वार्षिक योजनेतून केली जाणारी कामे वेळेत पुर्ण करुन उपलब्ध निधी खर्च करण्याचे निर्देश त्यांनी सर्व विभागप्रमुखांना यावेळी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सूर्यवंशी यांच्यासह सर्व विभागप्रमुखांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी सन 2024-25 मधील कामांची स्थिती जाणून घेत, झालेल्या खर्चाची माहिती घेतली. तसेच अपुर्ण कामांची देखील स्थिती जाणून घेतली. प्रलंबित कामे लवकर पुर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या आर्थिक वर्षात विभागांना मंजूर निधी, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता तसेच खर्च व कामांची प्रगती यांचा आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला. सर्व विभागांनी मंजूर निधी आर्थिक वर्षात खर्च करणे आवश्यक आहे. ज्या विभागांच्या प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहे, त्यांनी त्या तातडीने प्राप्त करून घ्याव्यात. निधी वेळेत खर्च करण्याची जबाबदारी संबंधीत विभागांची असून निधी अखर्चीक राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. योजनेतून कामे करत असतांना ती वेळेत होण्यासोबतच गुणवत्तापुर्ण होतील याची दक्षता घ्यावी, असे ही यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी सांगितले.