घनसावंगी आणी अंबड तालुक्यात प्रतिबंधित सुगंधित सुपारीची खुलेआम विक्री सुरू असून, अन्न व सुरक्षा विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. या सुपारीची सार्वजनिक ठिकाणी, किराणा दुकानांत आणि पानटपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
तंबाखूमुक्त असल्याचे सांगून विक्री होणाऱ्या या सुपारीमध्ये घातक रसायने असण्याची शक्यता असून, ती आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. विशेषतः तरुण पिढी आणि शालेय विद्यार्थ्यात याचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
राज्यात सुगंधित सुपारी आणि गुटख्यावर बंदी असतानाही दोन्ही तालुक्यांत सर्रास विक्री होत आहे. काही ठिकाणी ही विक्री छुप्या पद्धतीने होत असली, तरीही अनेक व्यापारी खुलेआम हे पदार्थ विकताना दिसत आहेत. त्यावर अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे
स्थानिकांचा आक्रोश, कारवाईची मागणी
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, प्रशासनाने तातडीने छापे टाकून कारवाई करण्याची मागणी होत आहे. अन्न व सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी या विक्रीवर आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
——————————————-
“सुगंधीत सुपारी विक्रीबाबत माहिती उपलब्ध झाल्यास अन्न व औषधी विभागासह पोलीस यंत्रणा कारवाई करणार आहे. याबाबत मोहीम हाती घेणार असून, दोषीवर कारवाई करणार आहे.”
केतन राठोड, पोलिस निरीक्षक घनसावंगी