विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांच्यासाठी विशेष गौरव पुरस्कार
25 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि. 20
सन 2023- 24 विशेष गौरव पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कार्य करणारे माजी सैनिक /पत्नी /पाल्य यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
पुरस्काराची रक्कम रुपये 10 हजार व 25 हजार इतकी असून पुरस्कारासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता 10 वी 12 मध्ये 90 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेतलेल्या माजी सैनिक/विधवा पत्नीचे पाल्य असावे. राष्ट्रीय/ राज्य स्तरीय प्रतियोगितेत सुवर्ण /रौप्य/कांस्य यापैकी पदक मिळालेले असावे. खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेले असावे, खेळामध्ये मिळविलेले प्रमाणपत्र इंडिया ऑलम्पिक असोसिएशन, स्पोर्टस ऑथोरिटी ऑफ इंडिया, नॅशनल फेडरेशन यांनी प्रमाणित केलेले असावे. साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य व इतर कला क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कामगीरी/पुरस्कार प्राप्त असला पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी : पुर, जळीत, दरोडा, अपघात नैसर्गिक आपत्ती (भुकंप/वादळ) यामध्ये बहुमोल कामगिरी केलेली असावी. शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल पुरस्कार, तसेच आयआयटी, आयआयएम, एम्सस् अशा नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना सुध्दा पुरस्कार देण्यात येईल. यशस्वी उद्योजकांना पुरस्कार, सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार मिळविणारे असावेत.
वरील अर्ज दाखल करताना आपल्या कार्यासंबंधी वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रण/फोटो/प्रसिध्दी अर्जासोबत जोडावे. हे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे 25 सप्टेंबर 2024 किंवा त्यापूर्वी सादर करावे व या संधीचा जास्तीत जास्त माजी सैनिक व त्यांचे पाल्य यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.