शिक्षिका शर्मिला महेंद्र गावंड राज्यस्तरीय नारी सन्मान पुरस्काराने सन्मानित.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3
स्टेट वूनोवेशन अँड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय नारी शक्ती सन्मान सोहळा सोलापूर येथे आयोजित केला गेला. प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा ३५ महिलांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला.शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेवून अध्यापन करणाऱ्या तसेच ,शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करून अध्यापन सोपे करून मुलांच्यात आनंद निर्माण करणाऱ्या होतकरू महिलांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने केला गेला .या मध्ये रायगड जिल्ह्यातून उरण तालुक्यातून शर्मिला महेंद्र गावंड यांना सन्मानित करण्यात आले.कोरोना काळापासून त्यांनी विद्यार्थांच्या साठी वेगवेगळे उपक्रम राबवून व्हिडिओच्या माध्यमातून स्वत:च्या युट्यूबच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण देण्याचं काम या माध्यमातून केले.शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या या आदर्श कार्याची दखल घेत त्यांना द्रोणगिरी युवा पुरस्कार, शिक्षक परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार, शिक्षक संघ उरण च्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.सोलापूर येथे झालेल्या राज्य स्तरीय नारी सन्मान पुरस्कार सोहळ्यात शर्मिला गावंड यांना राज्यस्तरीय नारी सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी , सोलापूरचे मनपा आयूक्त शीतल वुगले – तेली , डॉ. सुहासिनी शहा, श्रीम भाग्यश्री बिले क्रीडा अधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा सोलापूर येथील किर्लोस्कर सभागृह हिराचंद नेमचंद वाचनालय येथे मोठया उत्साहात उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.रायगड जिल्ह्यातून एकमेव उमेदवार असलेल्या शर्मिला महेंद्र गावंड यांना राज्यस्तरीय नारी सन्मान पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.