विद्यार्थ्यांनी बौद्धिक, शारीरिक क्षमता वाढवून कौशल्य प्राप्त करावे – राज्यपाल हरिभाऊ बागडे

जालना/प्रतिनिधी,दि.2
बौध्दीक क्षमतेसाठी पाठांतर, वाचन आणि लिखाण चांगलेच झाले पाहिजे. नकला करुन काही फायदा होत नसते, तर माणूस हा मुळातच अभ्यासू असायला हवा. केवळ शिक्षण न घेता, कौशल्यपूर्ण शिक्षण ही काळाची गरज झाली आहे. हमखास रोजगार मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी बौद्धिक, शारीरिक क्षमता वाढवून कौशल्य प्राप्त करावे, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.
बदनापूर तालुक्यातील आन्वी येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेच्या संत श्री भगवानबाबा आश्रम शाळेच्या वसतिगृह भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, संस्थाध्यक्ष देवेन पटेल, उद्योजक सुनील रायठठ्ठा यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंडित दिनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेची 28 वर्षापासून ही शाळा अविरतपणे सुरु आहे. आन्वी येथील आश्रम शाळेत परिसरातील मुले शिकत असतात. नवीन वसतिगृहाच्या भूमिपुजनानंतर आता एका वर्षाच्या कालावधीत नवीन वसतिगृहाची इमारत बांधून तयार होईल. संत श्री भगवानबाबांच्या संदेशानूसार जीवन जगत असतांना दुसऱ्यांनाही आपण मदत केली पाहिजे, याच उदात्त हेतूने संस्थेची वाटचाल सुरु आहे. विद्यार्थी दशेत चपळता ही महत्वाची आहे. आता मुलींनी अबला न राहता सबला झाले पाहिजे. मुलींनी आजच्या काळात शारीरिक व बौध्दीक क्षमता वाढवावी. पाठ्यपुस्तक व्यतिरिक्त अवांतर पुस्तके वाचुन ज्ञानाचा साठा वाढवावा. तसेच शिक्षकांनीही मुलांना ज्ञानदानाचे काम सुयोग्य करावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठी शाळेतुनच संस्कारक्षम माणसे निपजली जातात – पालकमंत्री पंकजा मुंडे
शिक्षक हे आपल्या जीवनात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असतात. गुरु कधीही मुलांवर वाईट संस्कार करत नसतात. योग्य ती वाट दाखविण्याचे कार्य हे गुरुवर असते. तर दाखविलेल्या योग्य वाटेवर चालण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असते. आणि स्वत:च्या मनावर ताबा ठेवत, जो संस्कार गृहण करतो तोच जीवनात यशस्वी होत असतो. तरी मराठी शाळेतूनच संस्कारक्षम माणसे निपजली जातात, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी केले.
पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, मराठी शाळेत संस्कारक्षम पिढी घडवण्याची सक्षमता आहे. जिल्हाधिकारी, शासकीय अधिकारी, मंत्री पदापर्यंत झेप घेतलेल्या व्यक्तींचे शिक्षण हे मराठी शाळेमधूनच झाल्याचे आपल्याला दिसून येईल. संघर्षामधूनच इतिहास घडत असतो, त्यामुळे शॉर्टकट वापरुन पुढे जाण्याचा विचारसुध्दा मनात येवू देवू नका. मैदानी खेळ खेळा, शिक्षण घ्या आणि आपले जीवन यशस्वी करा असेही त्यांनी सांगितले. आज गावच्या गावे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहेत, या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ देण्याचे काम शासनाने केले आहे. या कार्यक्रमास ग्रामस्थ, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.