


निवेदनात म्हटले आहे की, जालना शहरातील नविन जालना भागात मोठ्या प्रमाणात कत्तलखाने आहेत. या ठिकाणी सर्रासपणे गोवंश हत्त्या केली जाते. मे. साहेबांना सांगू इच्छितो की, नविन जालनातील दाणा बाजार, कॉलेजरोड-पेन्शनपुरा, भीमनगर, जवाहरबाग-खांडसरी, मंगळबाजार, चमडा बाजार आदी भागात बेदिक्कत कत्तलखाने सुरु आहेत. या भागातील कत्तलखाने बंद करण्यात यावे. सुरु असलेल्या कत्तलखान्यास नविन जालन्यातील पोलीस प्रशासनाही जबाबदार आहे. पोलीसांवर राजकीय नेत्यांचा दबाव असल्याचे निवेदनात नमूद असून कत्तलखाने बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास अथवा गोवंश असलेले वाहन पकडल्यास पोलीसांना राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडावे लागते. या राजकीय नेत्यांमध्ये काही माजी नगरसेवकांसह विद्यमान लोकप्रतिनिधी व माजी लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. जिल्ह्यातील बाजार समितींचाही यात सहभाग दिसून येतो. त्यांच्याकडे प्राण्यांच्या नोंदी होतात. मात्र, बाजार समिती ही काहींच्या नोंदी करत नाही. त्यामुळे नोंदी नसलेली जनावरे ही कत्तलखान्याकडे येतात. शहरातील विविध चौफुलींवरून शहरात गोवंश असलेली वाहने शहरात प्रवेश करतात. प्रामुख्याने अंबड-मंठा बायपास कडून राजमहल पुलाकडे येणार्या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात गोवंश वाहतुक होते आहे. शहरातील कत्तलखाने तात्काळ बंद करण्यासाठी संबंधीत प्रशासकीय यंत्रणेस आदेश द्यावेत अशी मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर हिंदु महासभेचे प्रदेश संघटन मंत्री तथा केंद्रीय सदस्य धनसिंह सुर्यवंशी, देवगिरी प्रांतप्रमुख अॅड. ईश्वर बिल्होरे यांच्या स्वाक्षर्या आहेत.
माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री तसेच भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष संघ विचारसरणीचे रावसाहेब दानवे यांचे गोहत्ते संदर्भात व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या वेळेस एकाही हिंंदुत्ववादी संघटनेने विरोध केला नाही किंवा केला असेल तर दबक्या आवाजात… कारण ते त्या वेळी मंत्री होते. या घटनेची आठवण हिंदु महासभेचे धनसिंह सुर्यवंशी यांनी काढली. परंतु हिंदुत्वाचे गोडवे गाणारे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर व संघ परिवारातून आलेले आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यावेळी बघ्याची भूमिका निभावली म्हणजेच एकप्रकारे रावसाहेब दानवे यांना गोहत्तेसंदर्भात समर्थन दिल्या सारखे होते. असेही श्री सुर्यवंशी म्हणाले, अद्यापही मोठ्या प्रमाणात गोहत्त्या होत आहे. गोवंश चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. हे थाबंविण्यासाठी जिल्ह्यातील हिंदुत्वाचे गोडवे गाणार्यांनी प्रयत्न केले नाहीत तर आगामी निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवू असा ईशारा धनसिंह सुर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलतांना दिला आहे.
न्यायालयीन लढा उभारणार
गोवंश चोरीच्या घटना व गोहत्त्या येत्या काळात थांबविण्यास प्रशासनाला अपयश आल्यास भविष्यात न्यायालीय लढा उभारणार असल्याचे हिंदु विधिज्ञ महासभेचे अॅड. ईश्वर बिल्होरे यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे. प्रसंगी ते म्हणाले की, शहरात कत्तलखाने सुरु आहेत. गोवंशाची वाहतुक होते आहे. गोवंश चोरी होत आहे. हे थांबविण्यासाठी राजकीय अडथळे आहेत, पोलीस प्रशासनास मोकळीक हवी त्यांच्यावर राजकीय दडपण नको, हिंदु भावनेचा विचार करता राजकीय नेत्यांनीही ही बाब वेळीच लक्षात घेऊन गोवंश चोरी, हत्त्येसारखे प्रकार थांबवावे अन्यथा यासाठी न्यायालयीन लढा उभारणार असल्याचे श्री बिल्होरे म्हणाले.