“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ
महिलांनी एजंट अथवा दलालापासून सावध राहावे अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करु नये प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल गैरप्रकार आढळल्यास प्रशासनाला तात्काळ कळवावे -- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
जालना/प्रतिनिधी,दि.3
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला रुपये 1500/- इतकी रक्कम जमा केली जाणार आहे. अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, महापालिकेचे वार्ड ऑफीस, सेतू सुविधा केंद्र येथून पात्र महिलांना या योजनेचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करता येईल.
योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन शासनाने अर्ज दाखल करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे महिलांनी अर्ज दाखल करण्याकरीता गर्दी करु नये. योजनेचा अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रीया विनामूल्य आहे. महिलांनी एजंट अथवा दलालापासून सावध राहावे. कुणाच्याही अमिषाला बळी पडू नये. गैरप्रकार आढळल्यास जिल्हा प्रशासनाला तात्काळ कळवावे. कुठलीही अडचण आल्यास प्रशासनाकडून महिलांना संपूर्ण सहकार्य केले जाईल. तरी जालना जिल्हयातील जास्तीतजास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. शासनाने या मर्यादेत सुधारणा केली असून आता दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.1 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे.
परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल. वार्षिक रुपये 2 लाख 50 हजार उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
महिलांनी तालुका, जिल्हास्तरावर येण्याची व गर्दी करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही दलालांच्या भुलथापांना बळी पडू नका. गावातच ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सुपरवायझर, बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण यांच्याशी संपर्क साधावा. स्वतःही मोबाईल ॲप वरुन नाव नोंदणी करु शकता. ‘नारी शक्ती दूत’ ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. शहरी भागात वार्ड ऑफिसर, अंगणवाडी सेविका, सुपरवाझर, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी यांच्याशी संपर्क साधावा. नोंदणी साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नवनाथ वामन यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.