विविधतेचा वारसा जतन करणारी आपली राज्यघटना आहे. – बाळासाहेब खरात
शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले मत

जालना/प्रतिनिधी, दि.28
भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जालना येथील १०० शिक्षक क्लब तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बुलढाणा येथील शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात बोलत होते .आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश असुन त्यात सर्व धर्म समभाव मूल्याची गुंफण करण्यात आली आहे. यासर्व मूल्यांना न्याय देऊन संरक्षण करण्याचे काम राज्यघटना करत आहे. जगातील सर्वात मोठी आणि प्रगल्भ आपली लोकशाही शासनव्यवस्था याच संविधानानुसार कार्य करत आहे .अशा भारतीय राज्यघटनेचा अमृत महोत्सव यावर्षी साजरा होत आहे ही बाब आपल्यासाठी आनंदाची आहे.यासाठी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता , न्याय व इतर चांगल्या गोष्टींचा प्रसार होईल असे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेच्या प्रतीचे पुजनाने व दिपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. गोड गळ्याची बाल गायिका संबोधी इंगोले हिच्या स्वागत गीताने पाहुण्याचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मुख्याध्यापक आर.आर.जोशी हे तर प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी शाम देशमुख, गटशिक्षणाधिकारी रवी जोशी, प्रा.जवाहर काबरा, प्रा. यशवंत सोनुने, प्रा. सुजाता देवरे, एस.एन. कुलकर्णी, उदय शिंदे, ज्ञानेश्वर बोरूडे व राजेभाऊ मगर उपस्थित होते . याप्रसंगी प्रमुख अतिथींनी १०० शिक्षक क्लब कडून आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेचे स्वागत करून येणाऱ्या काळात अधिक मोठ्या प्रमाणावर अमृत महोत्सव साजरा व्हावा अशी आशा व्यक्त केली. तत्पूर्वी शिक्षक क्लबचे अध्यक्ष राजेभाऊ मगर यांनी प्रास्ताविक करतांना क्लबच्या कार्याची व या वक्तृत्व स्पर्धेची माहिती देऊन स्पर्धा आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या दात्यांचे आभार मानले.या वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षणासाठी प्रा. जालिंदर बटुळे, डॉ. रामदास निहाळ, ॲड. सौरभ औटे, डॉ. मंगल मुळे व श्रीम. सीमा सरपोतदार काम करणार आहेत.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अप्पासाहेब मुळे यांनी तर आभारप्रदर्शन माया कवानकर यांनी मानले. स्पर्धा आयोजनासाठी दत्तात्रय राऊतवाड, संतोष लिंगायत,संदीप इंगोले, चंद्रकांत धोत्रे, तुकाराम काकडे, विष्णू बिरादार, रामेश्वर धोपटे, बळीराम बागल, प्रदीप घाटेशाही, अमोल कंडारे , डॉ. शिवनंदा मेहेत्रे, माया कवानकर, मनिषा पाटील,ज्योती जोशी, कविता दाभाडे, शुभांगी लिंगायत, अश्विनी खंडागळे व प्रभा जाधव यांनी परिश्रम घेतले.