अशैक्षणिक कामे आणि आदर्श शिक्षक
हिंगोली/प्रतिनिधी,दि.3
अशैक्षणिक कामे आणि आदर्श शिक्षक
लेखक:- गुलाम जावेद, मुख्याध्यापक जि.प उर्दू शाळा शिरड शहापूर
अध्यापन व्यवसायाचा पाया ज्ञान आणि अध्यापनकार्य आहे.शिक्षकाची ओळख त्याच्या अध्यापन आणि ज्ञानावरून केली जाते.भूतकाळापासून आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात शिक्षकांच्या सन्मानार्थ “शिक्षक दिन” साजरा केला जातो.भारतातही हा दिवस 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.शिक्षक दिन हा समाज आणि विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्या प्रती सन्मान आहे,अर्थात “जीवन पालकांनी दिले आहे,पण जगण्याचे खरे कौशल्य आणि गुण शिक्षकांकडून मिळाले आहे” जणू अशी ही मान्यता आहे.हा दिवस सॉक्रेटिस,ॲरिस्टॉटलपासून ते आजपर्यंत प्रत्येक शिक्षकाला समर्पित आहे,ज्यांच्यामुळे जगाला प्लेटो,न्यूटन,नोबेल,थॉमसन, अब्दुल कलाम इत्यादीसारखे महान व्यक्तिमत्त्व मिळाले आहे आणि भविष्यातही असेच विद्यार्थी जगासाठी हितकारी ठरतील.याची प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे एपीजे अब्दुल कलाम आपल्या अग्निपंख उड्डाणाचे श्रेय आपल्या शिक्षकाला देतात,अलेक्झांडर एका प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देण्याचा मार्ग स्वीकारतो आणि अफलातून सारखा शिक्षक हजारो अलेक्झांडर निर्माण करू शकतो असे एतेहासिक वर्णन करतो.एकलव्य अंगठीच्या रुपात आपले आयुष्य शिक्षकाला अर्पण करतो,आजही अशी उदाहरणे जिवंत आहे की शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षक आपले जीवन एकाग्रतापुर्वक नवीन आव्हाने व अध्यापन पद्धती शिकून त्याचे अवलंब शिक्षण आणि अध्यापनसाठी करीत आहेत.
समाजाचा बदलता दृष्टिकोन :-
बदलत्या काळानुसार जेथे शिक्षण व अध्यापन सोबतच शिक्षकांमध्ये सुद्धा बदल झाला आहे तिथेच शिक्षक व त्याच्या कार्याकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोनही बदलत चालला आहे जेथे आपणास सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही पैलू दिसत आहे.शिक्षक आणि अध्यापन पद्धती बद्दल नकारात्मक चर्चा हे समाजाची एक विशेषता बनली आहे.समाज बहुतांश शिक्षकांबाबत सकारात्मक नाही,तसेच शिक्षकांच्या अध्यापनावर कमी आणि पगार व इतर कामांवर अधिक लक्ष केंद्रित होताना आपल्याला दिसेल.खासगी शाळांचा प्रभाव असलेल्या काही व्यक्ती शिक्षकांच्या शैक्षणिक उपक्रमांपेक्षा सांस्कृतिक व कलात्मक उपक्रमांना अधिक महत्त्व देतात.समाजातील काही घटकांमध्ये मर्यादित मानसिकता असली तरी शिक्षकाची उदासीनता व निष्क्रियताही तेवढीच कारणीभूत आहे.
शासनाचे धोरण व शिक्षकांची गुणवत्ता :-
इंग्रजांच्या काळापासून शिक्षण ही शासनाची जबाबदारी राहिली आहे.शिक्षणाचे प्रसार व शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी समाज व शासनात शिक्षक हा दुवा असतो.शासनद्वारे शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षणासाठी वेगवेगळी धोरणे राबविली जातात.भारत सरकार विविध कायदे व कार्यक्रमांच्या माध्यमातून शिक्षणासह शिक्षकांची गुणवत्ता उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे,परंतु सरकारच्या दर आठवड्याला येणाऱ्या धोरण,अभियान,उपक्रम व कार्यक्रमामुळे शिक्षकाचे भर शिक्षण,अध्यापनावर न राहता डेटा संकलन,ऑनलाइन व ऑफलाईन कामे,सर्वेक्षण,छायाचित्रे,प्रशिक्षण इत्यादी कार्यक्रमांवर केंद्रित झाले आहे आणि ह्यामुळे शिक्षक अशैक्षणिक कामात गुंतले आहेत.काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या टिपण्णी नंतर शासनाने लेखी परिपत्रक काढून शैक्षणिक व अशैक्षणिक कामे यांच्यात वर्गीकरण केले आहे असा असला तरी ही कामे शिक्षकांकडून काढून घेतील असे होणार नाही भूतकाळ हेच सांगतो.सध्या शासनाकडून दर आठवड्याला कमी-अधिक प्रमाणात येणाऱ्या मोहिम,उपक्रम व कार्यक्रमांमुळे शिक्षकच नव्हे तर विद्यार्थी व पालकही संतापले आहेत. तरी शासनाला फक्त कागदावर न दाखविता प्रत्यक्ष शिक्षकाला अशैक्षणिक कामापासून दूर करावे लागेल.
शिक्षकांनी आत्मचिंतन करावे :-
शासनाचे धोरण आणि समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक नसला तरी शिक्षकांनीही आपले कर्तव्य,जबाबदाऱ्या व स्थानाचे भान ठेवले पाहिजे.आजही शिक्षक संवर्गात अशी आदर्श माणसे आहेत,ज्यांचे जीवन, मरण आणि जीवनाचे ध्येय केवळ शिक्षण आणि अध्यापन आहे आणि ही स्वागतार्ह बाब आहे.आदर्श शिक्षक पुरस्काराचा विचार न करता हे नि:स्वार्थपणे सेवा करणारे समाजातील सूर्य आहेत.जे रात्र आणि दिवस आपले अध्यापन कार्य आणि विद्यार्थी विकास लक्षात घेऊन आपल्या अध्यापनात नावीन्यपूर्ण शोध घेतात आणि त्यांच्याकडे स्वतःसाठी किंवा आपल्या परिवारासाठी वेळ नसतो.असेच शिक्षक आहेत ज्यांची निवृत्ती किंवा बदली विद्यार्थी आणि पालकांना रडवते.तेथेच काही शिक्षक शिक्षणापेक्षा स्वत:च्या वैयक्तिक मालमत्ता, संपत्तीवाढ व इतर साधनांमध्ये अधिक गुंतलेले आहेत त्यांच्यासाठी अध्यापन हा पूरक व्यवसाय बनला आहे.नव्या युगातील नवीन शैक्षणिक पद्धतीसाठी ब्लॉग आणि युट्युब चॅनेल चालवणाऱ्या शिक्षक आणि शिक्षक संघटनेचे पदाधिकारींची सेवा शिक्षण क्षेत्रासाठीच असेल पण आपली सेवा आणि मानधनाचा हक्क आहे की आपल्या केंद्रस्थानी शिक्षण आणि अध्यापन असावे.अन्यथा शिक्षण स्त्रोत भक्कम होईल आणि शिक्षणाचा पाया कमकुवत,अशा प्रसंगी तंत्रस्नेही शिक्षक,शिक्षक संघटनेचे कर्तव्य पार पाडणारे शिक्षक,निबंधकार शिक्षक,कवी शिक्षक,पुस्तके लिहिणारे लेखक शिक्षक आदी शिक्षकांनी आपला वेळ,क्षमता,पैसा याचा समतोल वापर समाजातील शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता विकाससाठी करावे तरच आपण विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देऊ शकतो,अन्यथा शिक्षक अशैक्षणिक कामाचा प्रतिनिधी बनेल.जेंव्हा शासन व विविध सेवाभावी संस्थेतर्फे अशैक्षणिक कामावर आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो तेव्हा शिक्षकाचे मन अशैक्षणिक कामाकडे वळतो आणि अशैक्षणिक काम करणारा आदर्श शिक्षक अस्तित्वात येतो.
मोबाईल:- 9822677448
ईमेल:- sjaveed510@gmail.com