जिल्हा सामान्य रुग्णालयात रांगोळी व पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि. 20
राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत केंद्रीय क्षयरोग विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या सन 2025 अखेर देशातुन क्षयरोगाचे दुरिकरण करण्याचे ध्येय लक्षात घेऊन राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमाबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी व या कार्यक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी दिनांक 17 ते 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत जिल्ह्यात ‘निक्षय आठवडा’ राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हयामध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती होण्याच्या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमामध्ये परिचर्या महाविद्यालय, जालना येथील विद्यार्थी-विद्यार्थींनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थी-विद्यार्थींनींनी जिल्हा रुग्णालय येथील बाह्यरुग्ण विभागात रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थांनी क्षयरोग लक्षणे, औषधोपचार व क्षयरुग्णांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचे देखावे रांगोळी व पोस्टरच्या माध्यमातुन साकारण्यात गेले.
या स्पर्धेस जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.जी.एम.कुडलीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.राजेंद्र गाडेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.शितल सोनी, वैद्यकीय अधिकारी डॉ.बेबीसरोज घोलप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गजानन मस्के, वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश काकड व डॉ.परशुराम नागदरवाड यांनी भेट देऊन स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थांच्या रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे परिक्षण करुन प्रथम, व्दितीय, तृतीय व प्रोत्साहनपर क्रमांक काढले.
यावेळी अधिसेविका सावित्री गायकवाड, परिचर्या महाविद्यालय प्राचार्य पार्वती लोडते, पाठ्यनिर्देशक सचिन कोटकर, गजानन काळे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करुन सदरील स्पर्धेत सहभाग घेण्याकरीता प्रोत्साहीत केले. स्पर्धेत भाग घेऊन प्रथम, व्दितीय, तृतीय व प्रोत्साहनपर क्रमांक मिळविलेल्यांची माहिती गुगलफॉर्मव्दारे अपलोड करुन राज्यस्तरावर पाठविण्यात आली आहे. तसेच सदर स्पर्धेचे राज्यस्तरावरुन अवलोकन होऊन स्पर्धेत पात्र ठरलेल्यांना विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर पारितोषिक देण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जी.जी.लोखंडे, एस.एस.खंडागळे, गजानन काळे, डी.एस.जावळे, निलेश चव्हाण, कपिल कोकरे, ज्ञानेश्वर खटाणे यांनी परिश्रम घेतले. असेही जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.