विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करावा – पालकमंत्री अतुल सावे

जालना/प्रतिनिधी, दि. 7
जिल्हयाच्या विविध विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करावा. सन 2022-23 या वर्षातील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत. चालू 2023-24 या वर्षातील कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन कामे मार्गी लावावीत, असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी विभागप्रमुखांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) बाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार बबनराव लोणीकर, आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंटयाल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी बैठकीत दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले. याच बैठकीतील इतिवृत्तातील मुद्यांच्या अनुपालनावर चर्चा झाली. जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 मधील दि. 31 मार्च 2023 अखेरच्या खर्चाचा आढावा व सन 2023-24 च्या कामाचा आढावा घेण्यात आला.
पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, सन 2022-23 या वर्षातील प्रलंबित कामे व स्पीलचे कामे तातडीने पूर्ण करावीत. चालू वर्षातील कामेही मार्गी लावावीत. याशिवाय पोलीस विभागाला 20 गाड्या मंजूर करण्यात आल्या असून यावर्षी दहा गाडया त्यांना देण्यात येतील. एक रुपयात पिक विमाबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करुन शेतकऱ्यांना त्याचा लाभ द्यावा. बोगस बियाणांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन कडक कारवाई करावी. पावसाळयात दुर्घटना टाळण्यासाठी वीज विभागाने मेंटनन्सच्या कामाकडे जबाबदारीने लक्ष द्यावे. अवैध वाळू उत्खनन व विक्री विरोधात महसूल व पोलीस विभागाने कारवाई करावी. अतिक्रमण व बोगस पीआर कार्डबाबत पोलीसांनी कारवाई करावी. मागील वर्षीच्या अतिवृष्टीच्या अनुदान वितरणातील त्रुटी तातडीने दूर करुन लाभार्थ्यांना त्याचा लाभ द्यावा. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत योजना प्रभावीपणे राबवाव्यात. जलजीवन मिशनच्या कामांनाही गती द्यावी.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना/ओ.टी.एस.पी) सन 2023-24 अंतर्गत जिल्हयासाठी 358.2929 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 98.0393 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे.
दरम्यान, बैठकीनंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हा क्रीडा संकुलला भेट दिली. त्यांनी क्रीडा संकुल परिसरात सुरु असलेल्या विविध कामांची पाहणी करुन संबंधितांना सूचना केल्या. यावेळी आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर हे उपस्थित होते.