विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहासाठीचे अर्ज ऑनलाईन सादर करावेत
जालना/प्रतिनिधी,दि.6
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहे चालविली जातात. जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृहातील व्यावसायिक अभ्यासक्रम अथवा अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश चालु शैक्षणिक वर्षात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर शासकीय वसतिगृहाचे अर्ज ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त अनंत कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जालना जिल्ह्यात जालना, भोकरदन, अंबड व मंठा येथे मुलींचे व जालना, बदनापुर, अंबड, भोकरदन, घनसावंगी येथे मुलांचे असे एकुण 10 शासकीय वसतिगृहे शासकीय इमारतीत कार्यान्वीत असून सदर वसतिगृहामध्ये मुलींची 355 व मुलांची 500 असे एकुण 855 विद्यार्थी संख्या आहे. शासकीय वसतिगृहामध्ये इयत्ता आठवीच्या वर्गापासून प्रवेश देण्यात येतो. शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास व्यवस्था, भोजन, शैक्षणिक साहित्य व इतर सोयी- सुविधा पुरविल्या जातात. शासकीय वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग यांच्यासाठी प्रवर्गनिहाय जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शासकीय वसतिगृहातील रिक्त जागेवर गुणवत्तेनुसार प्रवर्गनिहाय व आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो.
शासनाने https://hmas.mahait.org हे पोर्टल कार्यान्वीत केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर दि. 30 ऑगस्ट 2024 पुर्वी ऑनलाईन अर्ज करुन त्या अर्जाची प्रिंट आऊट (हार्ड कॉपी) संबंधित शासकीय वसतिगृहात जमा कराणे आवश्यक आहे. अर्जाची हार्डकॉपी प्राप्त झाल्याशिवाय अर्जावर कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांनी दि. 31 जुलै 2024 पूर्वी थेट संबंधित वसतिगृहात ऑफलाईन अर्ज सादर केले असतील त्यांनी देखील ऑनलाईन अर्ज उपरोक्त https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे भरणे आवश्यक असून ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट प्रत संबंधित वसतिगृहात किंवा सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयास ऑफलाईनरित्या सादर करणे आवश्यक राहील. असे सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.